आयपीएलच्या तेराव्या हंगामात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ४, ६ आणि ९ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघात टी-२० सामने खेळवले जाणार होते. ही मालिका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता दोन्ही संघातले खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असणार आहेत.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाआधी ही मालिका सराव म्हणून दोन्ही संघांसाठी उपयुक्त ठरणार होती. परंतू आयसीसीने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषक पुढे ढकलला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर ही मालिका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान ही मालिका पुढे ढकलण्यात आल्यामुळे दोन्ही संघातले खेळाडू आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होऊ शकणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. परंतू आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना पहिल्या आठवड्यातील काही सामन्यांना मुकावं लागणार होतं. ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेसोबतची वन-डे मालिकाही रद्द केली आहे. याव्यतिरीक्त दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही सप्टेंबर महिन्यात आपला विंडीज दौरा स्थगित केला आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत.