ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट राखून विजय ; पाचव्यांदा जेतेपदाच्या शर्यतीत

अफगाणिस्तान संघाची युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील स्वप्नवत वाटचाल उपांत्य फेरीत संपुष्टात आली. माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने सहा विकेट राखून अफगाणिस्तानवर मात करताना पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.

गोलंदाजांच्या चोख कामगिरीनंतर जॅक एडवर्ड्सने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेले १८२ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३७.३ षटकांत ४ बळींच्या मोबदल्यात पार केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय अफगाणिस्तानच्या अंगलट आला. यष्टिरक्षक, फलंदाज इक्रम अली खिल वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. खिलने ११९ चेंडूंत ८ चौकारांच्या साहाय्याने ८० धावांची खेळी साकारल्याने अफगाणिस्तानला १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन मेर्लोने सर्वाधिक चार, तर झ्ॉक इव्हान्सने २ बळी टिपले. प्रत्युत्तरात एडवर्ड्सने ६५ चेंडूंत ७२ धावांची आक्रमक खेळी करीत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. या खेळीत त्याने ८ चौकार व दोन षटकार लगावले.

अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियासमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : ४८ षटकांत सर्व बाद १८१ (इक्रम अली खिल ८०, रहमनुल्लाह गुर्बाझ २०; जॉनथन मेर्लो ४/२४, झॅक इव्हान २/२६) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ३७.३ षटकांत ४ बाद १८२ (जॅक एडवर्ड्स ७२, परम उप्पल नाबाद ३२; क्वैस अहमद २/३५). निकाल : ऑस्ट्रेलिया ६ विकेट राखून विजयी.