ऑस्ट्रेलियाच्या बदली खेळाडू किआह सिमॉन याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलने ब्राझीलचे महिला विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले. सिमॉनने ८०व्या मिनिटाला ब्राझीलची अभेद्य बचावफळी भेदून अप्रतिम गोल करताना ऑस्ट्रेलियाला १-० अशा विजयासज उपांत्यपूर्व फेरीचे स्थान मिळवून दिले. फ्रान्सनेही मारिए लॉरे डेलीए हिच्या दोन गोलच्या बळावर दक्षिण कोरियाला ३-० असे नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
२३ वर्षीय सिमॉनला ६४व्या मिनिटाला मिचेली हेयमॅन हिला बदली खेळाडू म्हणूान मैदानात उतरवले. अटीतटीच्या या लढतीत दोन्ही संघांकडून आक्रमक आणि तितकाच बचावात्मक खेळ होत होता. अनेक डावपेच आखूनही गोल करण्यात अयपश येत होते. मात्र, ८०व्या मिनिटाला सिमॉनने ब्राझीलची दिग्गज खेळाडू मार्ता हिला चकवून अप्रतिम गोल करून ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा बाद फेरीत प्रवेश मिळवून दिला.
‘‘फुटबॉलमधील अव्वल देशाविरुद्ध विजय मिळवणे हा आनंददायक क्षण आहे. योग्य वेळी आणि योग्य जागी महत्त्वाच्या खेळाडूला मैदानात उतरवल्यावर काय होते, याचा नजराणा सिमॉनने पेश केला,’’ असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अ‍ॅलन स्टॅजसिस यांनी
व्यक्त केले. पुढील लढतीत ऑस्ट्रेलियाचा सामना गतविजेत्या जपन किंवा नेरदलँड यांच्यातील विजेत्याशी होईल.
दुसरीकडे मारिए लॉरे डेलीए (२ गोल) आणि एलॉडीए थॉमिस (१ गोल) यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर फ्रान्सने ३-० अशा फरकाने दक्षिण कोरियाला नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना तगडय़ा जर्मनीच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.