22 July 2019

News Flash

विश्वचषकाची तयारी.. परिपूर्ण की अपूर्ण?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील भारताच्या कामगिरीचा आढावा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील भारताच्या कामगिरीचा आढावा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभूत झाल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघाची ‘योजना-अ’ तयार असल्याचे सांगितले. परंतु ‘योजना अ’ अपयशी ठरल्यास ‘योजना-ब’ भारताकडे नाही, हेदेखील सर्वाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताला संघरचनेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये ते कितपत यशस्वी ठरले, याचे उत्तर सर्वासमोर आहे.

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चॅम्पियन्स करंडक, २०१७नंतर युवराज सिंग संघाबाहेर फेकला गेला व त्यानंतर जवळपास गेले दीड वर्ष भारताचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजासाठी सुरू झालेला शोध अद्यापही कायम आहे. सुरेश रैना, अंबाती रायुडू, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे यांसारखे असंख्य पर्याय भारताने या क्रमांकावर पडताळून पाहिले, परंतु एकानेही सातत्याने उत्तम खेळ केलेला नाही.

चौथा विशेषज्ञ जलद गोलंदाज

जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचे विश्वचषकातील स्थान पक्के आहे. परंतु यांच्यापैकी एखाद्याला दुखापत झाल्यास भारताकडे चौथा गोलंदाज नाही. खलिल अहमद, सिद्धार्थ कौल व उमेश यादव यांना मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे हार्दिक पंडय़ा किंवा विजय शंकर अशा अष्टपैलू गोलंदाजाचा मार्ग भारताला अवलंबावा लागणार आहे.

सलामीवीरांसाठी पर्याय

रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सध्याच्या घडीला विश्वातील सर्वोत्तम सलामीवीरांच्या जोडय़ांपैकी एक आहेत, यात शंका नाही. मात्र धवनची कामगिरी बेभरवशाची असून एखाद-दुसरा सामना वगळता त्याला २५ धावा करणेही कठीण जाते. रोहितला त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे प्रत्येक सामन्यात संधी देण्यात येते. परंतु या दोघांना अपयश आल्यास भारताकडे फक्त लोकेश राहुलचाच पर्याय उपलब्ध आहे.

दुसरा यष्टीरक्षक

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र फलंदाजीप्रमाणेच तो यष्टीरक्षणातही निष्प्रभ ठरला.

तिसरा फिरकीपटू

फिरकीपटू कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल हे चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे दोघांचेही अंतिम १५ खेळाडूंमधील स्थान निश्चित आहे. त्याशिवाय यांना रवींद्र जडेजाचा पर्याय असला तरी इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर तो किती यशस्वी ठरेल, याची खात्री नाही. तसेच एकदिवसीय संघात नियमितपणे स्थान मिळत नसल्याने त्याची कामगिरीदेखील खालावते आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला विश्वचषकापूर्वी आणखी एका फिरकीपटूचा पर्याय शोधावा लागणार आहे.

First Published on March 15, 2019 2:49 am

Web Title: australia beat india by 35 runs