गुलाबी चेंडूच्या उपयोगासह झालेल्या पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ३ विकेट्सनी मात केली. या विजयासह पहिली कसोटी, पहिला एकदिवसीय सामना, पहिला दिवसरात्र एकदिवसीय सामना, पहिली ट्वेन्टी-२० आणि आता पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटीत अशा सर्व पहिल्या सामन्यांत विजयश्री मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने नावावर केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी सरशी साधली.
दुसऱ्या डावात ५ बाद ११६ वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडने २०८ धावांची मजल मारली. मिचेल सँटनरने ५ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावांची खेळी केली. डग ब्रेसवेलने २७ धावा केल्या. जोश हेझलवूडने ७० धावांत ६ बळी घेतले. मिचेल मार्शने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड वॉर्नर आणि जो बर्न्‍स यांनी ३४ धावांची सलामी दिली. मात्र यानंतर सातत्याने ऑस्ट्रेलियाने सातत्याने विकेट्स गमावल्या. वॉर्नरने ३५ धावांची खेळी केली. शॉन मार्शने खेळपट्टीवर नांगर टाकत संघाच्या विजयाचा पाया रचला. विजय समीप आलेला असताना मार्श बाद झाला. त्याने ४९ धावांची खेळी केली. पीटर सिडल आणि मिचेल स्टार्कने संयमी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ५ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. हेझलवूडला सामनावीर तर वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड २०२ आणि २०८ (मिचेल सँटनर ४५, रॉस टेलर ३२, जोश हेझलवूड ६/७०) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : २२४ आणि ७ बाद १८७ (शॉन मार्श ४९, डेव्हिड वॉर्नर ३५, ट्रेंट बोल्ट ५/६०)
सामनावीर : जोश हेझलवूड
मालिकावीर : डेव्हिड वॉर्नर