अ‍ॅडलेड : मार्कस स्टोईनिस, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या वेगवान गोलंदाजीच्या त्रिकुटाने मिळून केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. आस्ट्रेलियाने दिलेल्या २३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ निर्धारित ५० षटकांत नऊ फलंदाजांच्या मोबदल्यात २२४ धावाच करू शकला.

प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅरोन फिंच (४१), ख्रिस लीन (४४) व अ‍ॅलेक्स करी (४७) यांनी केलेल्या झुंजार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने किमान २३१ धावा केल्या. आफ्रिकेसाठी कगिसो रबाडाने तीन, तर डेल स्टेनने दोन गडी गारद केले.

प्रत्युत्तरात स्टोईनि, स्टार्क व हेझलवूड यांच्यापुढे आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडाली. कर्णधार फाफ डय़ूप्लेसिस (४७), डेव्हिड मिलर (५१) यांनी संघाच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. तब्बल नऊ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियाला या मैदानावर विजय मिळवण्यात यश आले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ४८.३ षटकांत सर्वबाद २३१ (आरोन फिंच ४१; कगिसो रबाडा ४/५४, डेल स्टेन २/३१) विजयी वि.

दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ९ बाद २२४ (डेव्हिड मिलर ५१; मार्कस स्टोइनिस ३/३५, जोश हेझलवूड २/४२).

’ सामनावीर : अ‍ॅरोन फिंच