दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर १७७ धावांनी विजय

वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर १७७ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी होबार्ट येथील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने डाव आणि २१२ धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑनला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी एकही षटक न खेळता दुसरा डाव ३ बाद १७९ या धावसंख्येवर घोषित करीत वेस्ट इंडिजपुढे ४६० धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला आश्वासक सुरुवात करता आली नाही. त्यांच्या फलंदाजांना ठरावीक फरकाने बाद करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आले आणि त्यांनी वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २८२ धावांमध्ये संपुष्टात आणला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डर (६८) आणि यष्टिरक्षक दिनेश रामदिन (५९) यांनी सहाव्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटल्यावर वेस्ट इंडिजचा संघ ३२ धावांमध्ये तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाकडून  मिचेल मार्शने चार आणि लिऑनने तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५५१.

वेस्ट इंडिज (पहिला डाव) : २७१.

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ३२ षटकांत ३ बाद १७९.

वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ८८.३ षटकांत सर्व बाद २८२ (जेसन होल्डर ६८, दिनेश रामदिन ५९; मिचेल मार्श ४/६१, नॅथन लिऑन ३/८५)