ख्रिस गेलच्या फटकेबाजीनिशी वेस्ट इंडिजने आपल्या डावाला प्रारंभ केला आणि डॅरेन सॅमीने त्याच स्फोटक आवेशात दोन षटकारांनिशी विजयावर शिक्कामोर्तब केले. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील दुसऱ्या गटामधील रोमहर्षक लढतीत वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट राखून पराभव केला आणि ‘कॅलिप्सो’च्या ठेक्यावर आपल्या थरारक विजयाचा आनंद साजरा केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ८ बाद १७८ धावा उभारल्या. ग्लेन मॅक्सवेल (४५) आणि ब्रॅड हॉज (३५) यांचे त्यात महत्त्वाचे योगदान होते. मग वेस्ट इंडिजने दोन चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या दोन षटकांत विंडीजला विजयासाठी ३१ धावांची आवश्यकता असताना सॅमीने मिचेल स्टार्कच्या १९व्या षटकात १९ धावा काढल्या. मग जेम्स फॉल्कनरच्या अखेरच्या षटकात १२ धावा काढत सॅमीने विंडीजचा विजय साजरा केला. सॅमीने फक्त १३ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १७८ (ग्लेन मॅक्सवेल ४५, ब्रॅड हॉज ३५; सुनील नरिन २/१९) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ४ बाद १७९ (ख्रिस गेल ५३, डॅरेन सॅमी नाबाद ३४; मिचेल स्टार्क २/५०)
सामनावीर : डॅरेन सॅमी.