टी २० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वोच्च धावसंख्येच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० सामन्यात ग्लॅन मॅक्सवेलच्या ६५ चेंडूत १४५ धावांच्या आधारे ऑस्ट्रेलियाने २० षटकांमध्ये २६३ धावांचा डोंगर उभा केला.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात पहिला टी २० सामना रंगला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीलंकेच्या कर्णधाराचा हा निर्णय ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर मॅक्सवेल आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या ५८ धावा झाला असताना वॉर्नर २८ धावांवर बाद झाला. मात्र मॅक्सवेलने त्याची स्फोटक फलंदाजी सुरुच ठेवली. मॅक्सवेलने १४ चौकार आणि नऊ षटकारांची बरसात करत नाबाद १४५ धावा केल्या. त्याला उस्मान ख्वाजाने ३६ धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. तर ट्रॅव्हिस हेडने १८ चेंडूत ४५ धावा करत संघाला २५० चा पल्ला ओलांडून दिला. ऑस्ट्रेलियांने २० षटकांमध्ये ३ गडी गमावत २६३ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे रजिथा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३ षटकांमध्ये ४६ धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने लंकेवर ८५ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने दिलेले हे लक्ष्य गाठताना लंकेला २० षटकांमध्ये ९ विकेट गमावत १७८ धावाच करता आल्या.

टी २० क्रिकेटमध्ये हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेनेच २००७ मध्ये केनियाविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ६ गडी गमावत २६० धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना २० षटकांमध्ये ६ गडी गमावत २४८ धावा केल्या होत्या. टी २० सर्वोच्च धावा करणा-या फलंदाजांच्या यादीत मॅक्सवेल दुस-या स्थानी पोहोचला आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचचा क्रमांक लागतो. त्याने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या. विशेष म्हणजे टॉप तीन फलंदाजांच्या यादीतले तिघे फलंदाज हे ऑस्ट्रेलियाचेच आहेत. विशेष म्हणजे वन डेतही श्रीलंकेचा सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडने मोडला होता. तर आता ऑस्ट्रेलियानेही श्रीलंकेचाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला आहे.