भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा नवा दृष्टीकोन संघामध्ये कोणताही अडथळा पार करण्याचा आत्मविश्वास निर्माण करत असल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने म्हटलं आहे. भारतीयांचं क्रिकेटवरील प्रेम दर्शवणारा एक माहितीपट स्टीव्ह वॉ तयार करत असून यावेळी त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. “Capturing Cricket: Steve Waugh in India” नावाने हा माहितीपट तयार केला जात आहे. यावेळी स्टीव्ह वॉने आपण पहिल्यांदा भारतात आलो होतो तेव्हाच्या आठवीदेखील सांगितल्या आहेत.

“विराट कोहलीचा नवा दृष्टीकोन भारतीय संघात प्रत्येक अडथळा पार करण्याची सवय निर्माण करत असून विरोधकांना न घाबरता तो पार केला जात आहे,” असं स्टीव्ह वॉने म्हटलं आहे. विराट कोहलीने भारतीय संघाची मानसिकता बदलला असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

“कोहलीबद्दल सर्वांना एक गोष्ट आवडत आहे ती म्हणजे नवा दृष्टीकोन, तोदेखील विरोधकांना न घाबरता. साध्य करु शकतो आणि शक्य आहे ते प्रत्येक आव्हान स्वीकारा असा नवा मंत्रच त्याने दिला आहे. विराट मॉडर्न डे हिरोप्रमाणे आहे,” असं स्टीव्ह वॉने म्हटलं आहे.

दरम्यान स्टीव्ह वॉने १९८६ मध्ये आपण पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा मोठा धक्का बसला होता अशी आठवण सांगितली आहे. “त्यावेळच्या बॉम्बेमध्ये आल्यानंतर मला खूप मोठा सांस्कृतिक धक्का बसला होता. सगळीकडे नुसती लोकं होती. रस्त्यांवर कार, बाईक, जनावरं आणि फुटपाथवर उंदिर, मांजरं धावताना पाहून आपण कुठे आलो आहोत असा विचार केला होता. मी एका वेगळ्या जगात असल्याचं वाटत होतं आणि हे सर्व धक्कादायक होतं,” असं स्टीव्ह वॉने म्हटलं आहे.