रविवार विशेष : प्रशांत केणी

दीड वर्षांपूर्वी चेंडू फेरफार प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने कडक कारवाई करीत कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कटाचा सूत्रधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची तर कॅमेरून बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील एक कलंकित पान लिहिणाऱ्या या त्रिकुटाच्या शिक्षेबाबत जागतिक जनक्षोभानंतरही संघटना ठाम राहिली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटने डॉ. सिमॉन लाँगस्टाफ यांच्याकडून ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या संस्कृतीचा आढावा’ हा अहवाल मागवला. कोणतीही किंमत मोजून विजय हवाच, अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची संस्कृती होती. त्यावर आधारित निरीक्षणे आणि निष्कर्ष लाँगस्टाफ यांनी आपल्या अहवालात नोंदवले. खेळाडूची वृत्ती आणि मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वागणूक हे सर्व मुद्दे राष्ट्राच्या-राज्याच्या क्रीडा विकासात कसे महत्त्वाचे ठरतात, हे त्यांनी यात नमूद केले आहे.

महाराष्ट्राच्या कबड्डी यापेक्षा गंभीर घटनेमुळे वादाचे मोहोळ उठले आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला राष्ट्रीय कबड्डीच्या इतिहासात प्रथमच साखळीत गारद होण्याची नामुष्की यंदा ओढवली. राजस्थान-केरळ सामन्याच्या निकालाबाबतचा निष्काळजीपणा आणि त्यावर बेतलेली अखेरचा साखळी सामना जाणीवपूर्वक हरण्याची रणनीती या दोन चुका महाराष्ट्राला भोवल्या. हे प्रकरण तसे गंभीर असल्याने शिस्तपालन समितीने र्सवकष अभ्यास करीत प्रशिक्षक श्रीराम भावसार आणि वरिष्ठ खेळाडू दीपिका जोसेफ यांना पाच वर्षांची शिक्षा तर कर्णधार सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि व्यावस्थापिका मनीषा गावंड यांना दोन वर्षांच्या शिक्षेची शिफारस केली. तसेच अन्य नऊ खेळाडूंनाही ताकीद दिली. पराभवासंदर्भात आतापर्यंत चौकशी समित्या बऱ्याचदा नेमल्या गेल्या. १९७३प्रमाणे क्वचितच काही वेळा कारवायासुद्धा झाल्या, तर बऱ्याचदा त्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. साखळीत विजय मिळवल्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात त्याच राजस्थानविरुद्ध पत्करलेल्या पराभवाची घटना काही वर्षांपूर्वीचीच. परंतु यावेळी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्या अहवालांनंतरही खेळाडूंकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेणारी लेखी परीक्षा आणि वैयक्तिक चौकशी करून कारवाईचे धारिष्टय़ दाखवले गेले. त्यामुळेच याबाबत संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत.

या घटनेत आता पुण्याच्या पंचतारांकित वर्चस्वाविरुद्ध हे षङ्यंत्र असल्याचेही आरोप केले जात आहेत. कारण १२ खेळाडूंमध्ये पुण्याच्या पाच खेळाडू होत्या. या पाचपैकी कामगिरीच्या बळावर किती आणि संघात हव्या म्हणून निर्देशित खेळाडू किती हे जाणून घेतल्यास पुण्याचे वर्चस्व कसे आले, ते स्पष्ट होऊ शकेल. महाराष्ट्राचा महिला संघ नेमका कुठे चुकला? याची अनेक उत्तरे अहवालाद्वारे स्पष्ट झालेली आहेत. महाराष्ट्राच्या संघनिवडीपासूनच याला प्रारंभ झाला. प्रशिक्षकांवरील ठपक्यातील पहिलाच मुद्दा हा सरकार्यवाहांना वेठीस धरणे असा आहे. भावसार यांच्याकडे जबाबदारी सोपवल्यानंतर महिलांचे विशेषज्ञ प्रशिक्षक आपल्याकडे नाहीत का, असा सवालसुद्धा केला जात होता. पण दरवर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या महिला संघासाठी हा एक वेगळा प्रयत्न झाला असावा. कारण भावसार प्रशिक्षणातील आधुनिक प्रणाली जाणतात. मागील वर्षी राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष संघासाठी त्यांनी आधी एक विशेष शिबिर आयोजित केले होते.

महाराष्ट्राला अनेक वर्षे निवड समितीची घडी नीट बसवता आलेली नाही. मागील दोन वर्षांचा आढावा घेतला, तरी अशी अनेक प्रकरणे सहज समोर येतात. पण महाराष्ट्राच्या यशापेक्षा आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंची निवड ही प्रत्येक संघटकाला महत्त्वाची वाटते. त्यामुळे निवड समिती सदस्य, प्रशिक्षक, कार्यकारिणी सदस्य यांचे निर्देशित आणि संघासाठी आवश्यक खेळाडू यांचे समीकरण साधणे, हे अवघड आव्हान प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या कबड्डीला पेलावे लागते.

महाराष्ट्राने जर जाणीवपूर्वक सामना गमावला आहे, अशी कबुली दिली आहे, तर भारतीय कबड्डी महासंघाकडून याची चौकशी का झाली नाही? भारतीय महिला संघाच्या शिबिरासाठी निवड झालेल्या ४२ खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या याच तीन मुली सहभागी आहेत, तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या केरळची फक्त एकच मुलगी संघात आहे. साखळीत गारद झालेल्या एखाद्या संघाचे तीन खेळाडू निवडले गेले असते किंवा राज्याने उपांत्य फेरी गाठूनही एकच खेळाडू निवडला गेला असता तर त्याबाबत अन्याय झाला, असा टाहो महाराष्ट्राने फोडला नसता का?

खेळाडूंसाठी आचारसंहिता तयार करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. शिस्तपालन समितीच्या शिफारशींबाबत आता कार्यकारिणी समिती ठाम राहील का, हे महाराष्ट्राच्या आगामी शिस्तीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. जेणेकरून राष्ट्रीय-राज्य अजिंक्यपद किंवा राज्यात होणाऱ्या विविध स्पर्धाबाबत खेळाडूंवर नियमांनुसार अंकुश राहील. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या कबड्डीच्या संस्कृतीचा अभ्यास करणेही महत्त्वाचे ठरेल.

महाराष्ट्राला पराभूत करण्याचे धोरण आखणाऱ्यांबाबत शिस्तपालन समितीने शिफारस केल्यानंतर शिक्षा काय असावी, याबाबत चर्चा रंगत आहेत. यात दोषींविरोधात जशी चीड निर्माण झाली आहे, तशीच खेळाडूंचे नुकसान होऊ नये, म्हणून सहानुभूतीची लाटसुद्धा निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर दोनच दिवसांनी कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कबड्डी दिनाचा कार्यक्रम वांद्रे येथे झाला. यावेळी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आला होता. याऐवजी ‘राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे पाऊल अडते कुठे?’ यावर आत्मचिंतन करण्याची आता नितांत आवश्यकता आहे. – prashant.keni@expressindia.com