|| प्रशांत केणी
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन २-१ असे नमवल्यानंतर आता संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे भारतामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे दडपण इंग्लंडवरच अधिक आले आहे. याचप्रमाणे ही मालिका भारतीय भूमीवर असल्याने घरगुती खेळपट्ट्यांची अनुकूलताही भारताला मिळू शकेल. त्यामुळे भारतासाठी हा पेपर सोपा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पण इंग्लंड संघाला कमी लेखण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण गेल्या १० वर्षांतील भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेटची आकडेवारी इंग्लंडसाठी अनुकूलता दर्शवते. २०१२ मध्ये अॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने भारतामधील कसोटी मालिका फिरकी गोलंदाजीच्या बळावर २-१ अशी जिंकण्याची किमया साधली होती. गतवर्षी एकदिवसीय क्रिकेट प्रकारातील विश्वविजेतेपद काबीज करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियापेक्षाही भक्कम स्थान निर्माण केले आहे. गेल्या वर्षभराचा जरी आढावा घेतला तरी इंग्लंडने वेस्ट इंडिज, पाकिस्तानला मायदेशात आणि श्रीलंकेला त्यांच्या देशात पराभूत करण्याचे कर्तृत्व दाखवले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यश मिळवले असले तरी मागील वर्षाच्या पूर्वार्धात न्यूझीलंडमधील मालिकेत ०-२ अशी हार पत्करली होती. त्यामुळे भारताच्या कामगिरीत सातत्य नाही.
भारतीय संघ आता पूर्वीसारखा फिरकी गोलंदाजीवर विसंबून नाही, असे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा इंग्लंड संघाचा साहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्पने म्हटले आहे. थॉर्पच्या म्हणण्यातील तथ्य नाकारता येणार नाही. २०१९ मध्ये मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिकांमध्ये वेगवान गोलंदाजी हेच भारताचे बलस्थान होते. त्या मालिकेतील खेळपट्ट्या वेगवान माऱ्यासाठी अनुकूल अशाच करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजांनी ५९ बळी तर फिरकी गोलंदाजांनी ३७ बळी मिळवले होते.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जसप्रित बुमरा दुखापतीतून सावरला आहे, तर अनुभवी इशांत शर्मा संघात परतला आहे. त्यामुळे मोहम्मद शमी आणि उमेश यादव मालिकेसाठी उपलब्ध नसले तरी मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि हार्दिक पंड्या अशी वेगवान माऱ्याची दुसरी फळी सज्ज आहे. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा जरी दुखापतीमुळे संघाबाहेर असला तरी रविचंद्रन अश्विनला वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल उत्तम साथ देऊ शकतात. शार्दूल आणि सुंदर यांनी ऑस्ट्रेलियात गोलंदाजीसह फलंदाजीतही लक्षवेधी कामगिरी बजावली होती. ऑस्ट्रेलियात ऋषभ पंतने झुंजार फलंदाजीच्या बळावर भारताला तारले आणि यष्टीरक्षणातील अपयश झाकू न टाकले. पण भारतामधील मालिके साठी पंतला प्राधान्य देणार की अनुभवी वृद्धिमान साहाला संधी मिळणार, हेसुद्धा पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ऑस्टे्रलियात पृथ्वी शॉ मिळालेल्या संधीचे सोने करू शकला नाही. मयांक अगरवालसुद्धा सलामीचे सातत्य टिकवण्यात अपयशी ठरला. परंतु अनुभवी रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने मात्र विश्वासार्हता निर्माण केली आहे. कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीनंतर संघात परतला आहे. ऑस्ट्रेलियात प्रभारी कर्णधार म्हणून यश मिळवणारा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त आहे. ऑस्ट्रेलियात मधल्या आणि तळाच्या फळीने कसोटी क्रिकेटमधील झुंजार वृत्ती दाखवून दिली आहे.
इंग्लंडने आव्हानात्मक हंगामाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचे नियोजन करताना जॉनी बेअरस्टो, सॅम करन आणि मार्क वूड यांना विश्रांती दिली आहे, तर श्रीलंका दौऱ्यावर नसलेले बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रॉरी बन्र्स संघात परतले आहेत. जोस बटलरसुद्धा पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. जो रूट, स्टोक्स या अनुभवी खेळाडूंसह झॅक क्रॉवली, बन्र्स यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या यशस्वी जोडगोळीसह आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्यावर इंग्लंडच्या वेगवान माऱ्याची मदार आहे. उपखंडातील खेळपट्ट्यांवर वर्चस्व गाजवणाऱ्या अनुभवी मोईन अलीसह डॉम बेस आणि जॅक लिच यांच्यावर फिरकीची धुरा आहे. इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेल्या निर्भेळ यशात बेस (१२ बळी) आणि लीच (१० बळी) यांचीच प्रमुख भूमिका होती.
तूर्तास, भारत-इंग्लंड मालिकेविषयी मायकेल वॉनसह आजी-माजी क्रिकेटपटू सावधपणे अंदाज वर्तवताना दिसत आहेत. कारण भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेबाबतचे त्यांचे अंदाज पूर्णत: चुकले होेते. त्यामुळे सध्या तरी भारत-इंग्लंड मालिकेतील उत्कंठा टिकून आहे.
१० वर्षांतील कामगिरीत इंग्लंड सरस
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील १२२ कसोटी सामन्यांत ४७ सामने इंग्लंडने आणि २६ सामने भारताने जिंकले आहेत. म्हणजेच भारताच्या विजयाची टक्केवारी २१.३१ इतकी आहे. गेल्या १० वर्षांतील २३ कसोटी सामन्यांपैकी १३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर ७ सामने भारताने जिंकले आहेत. २०१६-१७मध्ये इंग्लंडने भारत दौऱ्यावर ०-४ असा मानहानीकारक पराभव पत्करला होता, तर २०१८मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-४ अशी गमावली होती. भारतात उभय संघांमध्ये झालेल्या ६० कसोटी सामन्यांपैकी १९ भारताने आणि १३ इंग्लंडने जिंकल्या आहेत.
prashant.keni@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 12:43 am