ऑस्ट्रेलिया-इंग्लंड एकदिवसीय मालिका आजपासून
अॅशेस कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. उभय संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज जो रूट हा गॅस्ट्रोच्या आजारातून बरा झाला असून पहिल्या लढतीत खेळणार आहे. मात्र पोटदुखीने त्रस्त असलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या सहभागाबाबत साशंकता आहे.
गॅस्ट्रोची लागण झाल्याने सिडनीमध्ये झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पाचव्या दिवशी सकाळी रूटला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र तो तंदुरुस्त असल्याची माहिती कर्णधार इयॉन मॉर्गनने शनिवारी दिली.
रूट खेळत असल्याने इंग्लंडच्या गोटामध्ये आनंद असला, तरी उपकर्णधार वॉर्नर हा पोटदुखीमुळे खेळण्याची शक्यता कमी आहे. शनिवारच्या शेवटच्या सत्रात तो सहभागी झाला नव्हता. मात्र वॉर्नर खेळेल, अशी आशा यजमान कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केली आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानी असलेला वॉर्नर जगातील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो.
वेळ : सकाळी ८.५० वा.
थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2018 1:14 am