उस्मान ख्वाजाची दीडशतकी खेळी * न्यूझीलंडची घसरगुंडी
कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाने धावांची टांकसाळ कायम राखत ४ बाद ५५६ धावांवर पहिला डाव घोषित केला. अचूक आणि भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडची घसरगुंडी उडाली असून, दुसऱ्या दिवसअखेर त्यांची अवस्था ५ बाद १५७ अशी झाली आहे. न्यूझीलंडचा संघ अजूनही ३९९ धावांनी पिछाडीवर आहे. केन विल्यमसन ५५ तर ब्रॅडले वॉटलिंग १४ धावांवर खेळत आहेत.
२ बाद ३८९ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत धावांची फॅक्टरी कायम राखली. सात धावांची भर घालून कर्णधार स्टीव्हन स्मिथ तंबूत परतला. त्याने ४८ धावा केल्या. यानंतर उस्मान ख्वाजाने अ‍ॅडम व्होग्सच्या साथीने १५७ धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली. द्विशतकाकडे कूच करणाऱ्या ख्वाजाला विल्यमसनने बाद केले. त्याने १६ चौकार आणि २ षटकारांसह १७४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ४ बाद ५५६ धावसंख्येवर डाव घोषित केला. व्होग्सने ११ चौकारांसह नाबाद ८३ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मार्टिन गप्तिल आणि टॉम लॅथम यांनी ५६ धावांची सलामी दिली. जोश हेझलवूडने गप्तिलला बाद करीत ही जोडी फोडली. त्याने २३ धावा केल्या. यानंतर लॅथमला विल्यमनसनची साथ मिळाली. मिचेल स्टार्कने लॅथमला लॉयनकडे झेल देण्यास भाग पाडले.
लॅथमने ४७ धावा केल्या. मिचेल जॉन्सनने अनुभवी रॉस टेलरला भोपळाही फोडू दिला नाही. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध ब्रेंडन मॅक्क्युलमला केवळ ६ धावांवर माघारी धाडत जॉन्सनने ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. अष्टपैलू जेम्स निशामला त्रिफळाचीत करत मिचेल स्टार्कने न्यूझीलंडला अडचणीत टाकले. विल्यमसनने वॉटलिंगला हाताशी घेत सहाव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करत पडझड थांबवली.