अनुभवी डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाल्यानंतर लाबुशेन आणि पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीनं डाव सावरला आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियानं एका गड्याच्या मोबदल्यात ९३ धावा केल्या आहेत. पुकोव्हस्कीनं दमदार पदार्पण करत अर्धशतकी खेळी केली आहे. पुकोव्हस्की ५४ धावांवर नाबाद आहे. या खेळीदरम्यान त्यानं चार चौकारही लागावले आहेत. युवा पुकोवस्कीनं बुमराह, अश्विन, सैनी आणि सिराजचा खंबीरपणे सामना केला. पुकोव्हस्कीनं लाबुशेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागिदारी केली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मोहम्मद सिराजनं सुरुवातीलाच भेदक मारा करत वॉर्नरला माघारी धाडलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लाबुशेननं पुकोवस्कीच्या मदतीनं संघाचा डाव सावरला.

पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या पुकोव्हस्कीला पंतने यष्टीमागे दोन जीवदान दिले. २९ ३२ धावांवार असताना पंतने पुकोव्हस्कीचे झेल सोडले. पंतच्या या चुकीचा भारतीय संघाला मोठा फटका बसणार का? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. दरम्यान, सात षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे काहीवेळ सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे दिवसाच्या ९० षटकांमध्ये कपात करण्यात आली आहे.

रोहितचं पुनरागमन, सैनीचे पदार्पण
सिडनीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतील विजयासह नव्या वर्षांचा यशस्वी प्रारंभ करण्याचा निर्धार कर्णधार अजिंक्य रहाणेने केला आहे. उमेशच्या जागी वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा ऑस्ट्रेलियाने धसका घेतला असून, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्यासारख्या दर्जेदार फलंदाजांनाही अश्विनने तंबूची वाट दाखवून दरारा निर्माण केला. जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याचे आत्मविश्वासाने नेतृत्व करीत आहे. त्याच्या साथीला सिडनीत सैनी आणि मोहम्मद सिराज हे युवा गोलंदाज असतील.

ऑस्ट्रेलिाच्या संघात दोन बदल –
दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवनंतर ऑस्ट्रेलिया संघाने दोन बदल केले आहेत. जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांना आराम देण्यात आला आहे. तर डेव्हिड वॉर्नर आणि युवा फलंदाज पुकोव्हस्की यांना अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.