फिरकीपटू जॉर्जिआ वेरहॅमने (३/१७) केलेल्या अप्रतिम गोलंदाजीला सलामीवीर बेथ मूनीच्या (६०) अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर चार धावांनी सरशी साधली. या विजयासह ऑस्ट्रेलिया ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठणारा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला.

प्रथम फलंदाजी करताना मूनीव्यतिरिक्त कर्णधार मेग लॅनिंग (२१) आणि एलिस पेरी (२१) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. मूनीने ५० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ६० धावा केल्या.

प्रत्युत्तरात २० वर्षीय मनगटी फिरकीपटू वेरहॅमने अवघ्या १७ धावांत कर्णधार सोफी डिव्हाइन (३१), सूझी बेट्स (१४) आणि मॅडी ग्रीन (२८) या तिघींचे बळी मिळवून ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात २० धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडला १५ धावाच करता आल्याने त्यांना एकूण ७ बाद १५१ धावांवर समाधान मानावे लागले.

मंगळवारी ‘ब’ गटातील साखळी सामन्यांचा अखेरचा दिवस असून दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज यांच्यातील निकालानंतर गटातील क्रमवारीचे चित्र स्पष्ट होईल. आफ्रिका, इंग्लंड यांनी या गटातून उपांत्य फेरीतील स्थान यापूर्वीच पक्के केले आहे.