ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना आणि मालिका २-१ ने जिंकण्यासंबंधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भाष्य केले आहे. “आम्हाला गाबावर खेळायला आवडते पण पाहुण्या संघाला या मैदानावर खेळणे फारसे आवडत नाही” असे हेझलवूडने म्हटले आहे. हेझलवूडचे हे मत म्हणजे प्रत्यक्ष सामन्याआधी दबाव टाकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या रणनितीचा एक भाग असू शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर रंगणार आहे.
आणखी वाचा- काय आहे ब्रिस्बेनमधल्या टेस्टचा इतिहास? भारताला विजयाची कितपत संधी? जाणून घ्या…
सध्या दोन्ही संघ मालिकेत १-१ असे बरोबरीत आहेत. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची चांगली संधी होती. पण ऋषभ पंत, आर.अश्विन आणि हनुमा विहारीने ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवत कसोटी अनिर्णीत राखली. चौथ्या कसोटी सामन्यात भारतासमोर अनेक आव्हाने आहेत.
दुखापतीमुळे अष्टपैलू रविंद्र जाडेजा खेळण्याची शक्यता नाहीय. हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. पण भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीपासून अशा परिस्थितीचा सामना केला आहे. “सर्वच ऑस्ट्रेलियन्सन गाबावर खेळायला आवडते. पाहुण्या संघाला इथे फार खेळायला आवडत नाही, हे आम्हाला माहित आहे. मी नेहमीच इथे खेळण्याचा आनंद लुटलाय” असे हेझलवूड म्हणाला. गाबा मैदानाचा आतापर्यंतचा रेकॉर्डही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 4:24 pm