भारताला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी वेगवेगळ्या गोष्टीचा अभ्यास सुरु केलाय. भारतीय संघाची फलंदाजी मजबूत असून, भारताला पराभूत करायचे असल्यास त्यांना ३५० पेक्षा अधिक धावांचे आव्हान देणे गरजेचे आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने व्यक्त केले.  सराव सामन्यानंतर स्टॉयनिस म्हणाला की, ‘आम्हाला आगामी मालिकेत खूप धावा कराव्या लागणार आहेत. भारतीय फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारताला पराभूत करण्यासाठी धावफलकावर ३५० पेक्षा अधिक धावा उभारणे गरजेचे आहे.’ यावेळी त्याला कोणता भारतीय फलंदाज अधिक धोकादायक वाटतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, सर्वच भारतीय फलंदाज धोकादायक आहेत. त्यामुळे भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आम्हाला मोठी धावसंख्या उभारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने चेन्नईत बीसीसीआय अध्यक्षीय संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात ३४७ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात स्टॉयनिसने ६० चेंडूत ७६ धावांची खेळी केली होती. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने हा सामना १०३ धावांनी जिंकला होता.  आयपीएल स्पर्धेत स्टॉयनिसने दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेतील आठवणींना देखील त्याने उजाळा दिला. आयपीएलमध्ये खेळल्याचा तसेच भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम यांच्या मार्गदर्शनामुळे मला खूप फायदा झाला, असेही तो म्हणाला. १७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह तीन टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघ मालिका जिंकून एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.