भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. इतिहासावर नजर मारल्यास या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला सर्वस्वी पणाला लावावे लागेल.

गुलाबी चेंडूचा भारतीय संघाचा रेकॉर्ड –
गुलाबी चेंडूवर आतापर्यंत भारतीय संघ फक्त सामना खेळला आहे. तोही मायदेशात. गेल्यावर्षी कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर भारत-बांगलादेश यांच्यात पहिला सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघानं एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य –
ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर कांगारुंचा पराभव करणं कठीण आहे. गुलाबी चेंडूवरील एकही सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत सात दिवस-रात्रं सामने खेळला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानाचा फायदा तर होणारच आहे. त्याशिवाय सात कसोटी सामन्यातील अनुभवही त्यांच्यापाठीमागे आहे. त्यामुळेच दिवसरात्र सामन्यात भारतीय संघाची खरी कसोटी राहणार आहे.

दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच किंग –
आतापर्यंत १४ आंतरराष्ट्रीय दिवसरात्र सामने झाले आहेत. त्यापैकी एकट्या ऑस्ट्रेलियानं सात सामने खेळले आहेत. एडिलेड येथील मैदानावर पहिला दिवस-रात्र कसोटी सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्याच मैदानावर आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सामना होणार आहे.

वस्तुस्थिती काय आहे?

भारत : मागील यशात चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण कामगिरी आणि भारताचा वेगवान मारा हे घटक महत्त्वाचे ठरले होते. आगामी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारताच्या फलंदाजीची मदार पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कोहलीवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवेल. त्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची भिस्त जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर आहे.

ऑस्ट्रेलिया :  वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध आहे. त्यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या जो बर्न्‍ससह सलामीची चिंता ऑस्ट्रेलियाला सतावते आहे, पण आता ऑस्ट्रेलियाकडे चिवट फलंदाजी करणारा मार्नस लबूशेन हा तारणहार आहे. फक्त १४ कसोटी सामन्यांत त्याने ६३.४३च्या सरासरीने १४५९ धावा केल्या आहेत. पॅट कमिन्स आणि नॅथन लिऑन घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत.