आजपासून दिवसरात्र कसोटीला सुरुवात
गुलाबी चेंडूचा प्रयोग होणार
कसोटी क्रिकेटची परिभाषा बदलणाऱ्या दिवसरात्र कसोटीला अ‍ॅडलेड येथे शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या कसोटीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूचे पदार्पण होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सख्ख्या शेजाऱ्यांमध्ये हा मुकाबला रंगणार आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० आघाडीवर आहे. मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आतुर आहे तर ही कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ उत्सुक आहे. कसोटी सामन्यांची घसरती लोकप्रियता लक्षात घेऊन काही मूलभूत बदल करण्यात आले आहेत. १३८ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच लाल चेंडू दिसणार नाही. पहिली कसोटी अगणित वेळेची, चार चेंडूंच्या षटकाची आणि लाल चेंडूसह खेळली गेली. खंडप्राय कालावधीनंतर होणारी २१८८वी कसोटी पाच दिवसांची, सहा चेंडूंच्या षटकांची, गुलाबी चेंडूसह दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय लढतीत दिवसरात्र खेळण्याचा अनुभव क्रिकेटपटूंकडे आहे. मात्र दिवसरात्र कसोटीत गुलाबी चेंडूसमोर खेळण्याचे आव्हान फलंदाजांसमोर असणार
आहे
मिचेल जॉन्सनची निवृत्ती आणि उस्मान ख्वाजाला झालेली दुखापत यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघात पीटर सिडल आणि शॉन मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे.