पर्थ : आतापर्यंत सर्वाधिक सहा प्रकाशझोतातील कसोटी सामने जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेमधील पहिल्या प्रकाशझोतातील लढतीत विजयी परंपरा कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत तीन कसोटी खेळवण्यात येणार असून मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे रंगणार आहे. त्रिशतकवीर डेव्हिड वॉर्नर आणि युवा मार्नस लबूशेन ऑस्ट्रेलियासाठी सातत्याने धावा करत असून गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हॅझलवूड यांचे अनुभवी त्रिकूट सक्षम कामगिरी करत आहे. त्यामुळेच पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही ऑस्ट्रेलियाने निर्भेळ यश संपादन केले. दुसरीकडे मायदेशात इंग्लंडला १-० असे पराभूत करणाऱ्या केन विल्यम्सनच्या न्यूझीलंड संघाला तब्बल ३० वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.