ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका

फिरकीपटू नेथन लिऑनच्या प्रभावी माऱ्यापुढे न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर २४३ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.

लिऑनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. लिऑनने ६८ धावांत पाच बळी मिळवले. पहिल्या डावात २०३ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर २३ तर जो बर्न्‍स १६ धावांवर खेळत आहे.

टॉम लॅथम (४९) आणि टॉम ब्लंडेल (३४) यांनी ६८ धावांची सलामी देत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या क्रमांकावरील जीत रावल यानेही ३१ धावांचे योगदान दिले. पण मधल्या फळीतील ग्लेन फिलिप्सचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही.

फिलिप्सला तीन वेळा जीवदान मिळाले. त्याचा फायदा उठवत फिलिप्सने ५२ धावांची खेळी साकारली. पण अनुभवी रॉस टेलर (२२), कॉलिन डे ग्रँडहोम (२०) यांनी निराशा केल्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४५४

न्यूझीलंड (पहिला डाव) : सर्व बाद २५१ (ग्लेन फिलिप्स ५२, टॉम लॅथम ४९, टॉम ब्लंडेल ३४; नेथन लिऑन ५/६८, पॅट कमिन्स ३/४४).

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : बिनबाद ४० (डेव्हिड वॉर्नर खेळत आहे २३, जो बर्न्‍स खेळत आहे १६).