पर्थ : डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (३१ धावांत ४ बळी) भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस न्यूझीलंडची ५ बाद १०९ धावा अशी अवस्था झाली असून ते अद्यापही ३०७ धावांनी पिछाडीवर आहेत.

गुरुवारच्या ४ बाद २४८ धावांवरून पुढे खेळताना शतकवीर मार्नस लबूशेन आणि ट्रेव्हिस हेड यांनी पाचव्या गडय़ासाठी ७६ धावांची भागीदारी रचल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावापर्यंत मजल मारली. लबूशेन १४३, तर हेड ५६ धावांवर बाद झाला.

प्रत्युत्तरात एका धावेवरच दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांच्या अनुभवी जोडीने ७६ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. परंतु स्टार्कने विल्यम्सनला (३४) बाद केले आणि न्यूझीलंडचा डाव पुन्हा घसरला. दिवसअखेर टेलर ६६, तर बीजे वॉटलिंग शून्यावर खेळत आहे.