मेलबर्न : करोना संसर्गामुळे ऑस्ट्रेलिया खुली टेनिस स्पर्धा नेमकी कोणत्या तारखेपासून सुरू होणार हे अजून निश्चित झालेले नाही. व्हिक्टोरिया राज्य सरकारकडून अजून टेनिस ऑस्ट्रेलियाला स्पर्धेच्या आयोजनाविषयी कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. या स्थितीत १८ ते ३१ जानेवारीऐवजी ही स्पर्धा तीन आठवडे म्हणजेच ८ फेब्रुवारीपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

यासंबंधी स्पर्धेचे संचालक क्रेग टिले यांनीदेखील खेळाडूंना ८ फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरू होईल, अशी माहिती दिल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील काही वृत्तपत्रांनी दिले आहे. करोनाकाळातील नियमाप्रमाणे खेळाडूंना १५ जानेवारीपासून विलगीकरण सक्तीचे होते. मात्र खेळाडूंना विशेष नियमावली म्हणून विलगीकरणाच्या सक्तीतून वगळण्यात यावे, ही आयोजकांची विनंती व्हिक्टोरिया सरकारने मान्य केल्याचे कळते. आयोजकांनी खासगी विमान, विलगीकरण काळातील खर्च आणि राहण्याचा खर्चदेखील खेळाडूंना देण्याचे मान्य केल्याचे समजते.

टिले यांनी १४ दिवसांच्या विलगीकरण काळात खेळाडूंना सराव करता यावा या दृष्टीने बंदिस्त वाहन व्यवस्थाही करणार असल्याचे म्हटले आहे. व्हिक्टोरियाचे क्रीडामंत्री मार्टिन पाकुला यांनीदेखील ऑस्ट्रेलिया खुली स्पर्धा दोन आठवडय़ांनी लांबणीवर पडणार असल्याचे गेल्या आठवडय़ात सांगितले होते. व्हिक्टोरिया येथे करोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने पुन्हा कडक टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. आता टाळेबंदी उठवल्यानंतर नव्याने करोना रुग्ण सलग ३४ दिवसांमध्ये आढळलेला नाही. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या आधी होणाऱ्या अन्य ‘एटीपी’ आणि ‘डब्ल्यूटीए’ स्पर्धादेखील होण्याची शक्यता कमी आहे.

स्पर्धेपूर्वी पाच चाचण्या

स्पर्धेपूर्वी खेळाडूंना एकूण पाच चाचण्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियात आगमन होताच क्षणी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येईल. तसेच स्पर्धेला सुरुवात होईपर्यंतदेखील त्यांच्या चार करोना चाचण्या होण्याची शक्यता आहे.