भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलने झंझावती शतक (११३*) ठोकत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांची टी २० मालिका २-० अशी जिंकली. याबाबत बोलताना कर्णधार विराट कोहली याने पराभवाचे विश्लेषण केले.

विराट म्हणाला की आम्ही मालिका गमावली कारण ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस ठरला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही आघाड्यांवर आमची कामगिरी सुमार झाली आणि त्याची झळ आम्हाला बसली. ही मालिका अत्यंत छोटी होती त्यामुळे या मालिकेचे सार सांगणे कठीण आहे. पण ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीचा खेळ केला, त्यानुसार त्यांचा विजय होणे निश्चित होते.

टी २० मध्ये जगातील कोणत्याही मैदानावर १९० ही चांगली आणि स्पर्धात्मक धावसंख्या आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना मॅक्सवेलने ज्या प्रकारे फटकेबाजी केली, ते पाहता गोलंदाजांही हतबल झाले होते. त्यातच मैदानावर असलेले दव हे गोलंदाजांना प्रयोग करण्यापासून रोखत होते. या सर्व बाबींचा एकत्रित तोटा आम्हाला भोगावा लागला, असेही विराट म्हणाला.

दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हुकले. तो २६ चेंडूत ४७ धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. त्यानंतर धोनीच्या २३ चेंडूत ४० धावा आणि विराटच्या ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा यांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने एकहाती किल्ला लढवला. त्याला जोरदार फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टची काही काळ साथ मिळाली. शॉर्ट ४० धावांवर झेलबाद झाला. पण मॅक्सवेलने डाव सांभाळला आणि फटकेबाजी करत शतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकत ५५ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.