भारताशी चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने १७ सदस्यीय संघ निवडताना गोलंदाजीचा मारा अधिक भक्कम करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने ग्लेन मॅक्सवेल आणि मोझेस हेन्रिक्स यांना कसोटी क्रिकेट संघात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय उपखंडातील फिरकीला अनुकूल वातावरणाचा लाभ घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात चार फिरकी गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. नॅथन लिऑनसोबत झेव्हियर डोहर्टी आणि स्टीव्हन स्मिथ फिरकीची जबाबदारी पार पाडतील.
दुखापतीतून सावरलेल्या जेम्स पॅटिन्सनने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. पॅटिन्सनसह पिटर सिडल, जॅक्स बर्ड, मिचेल स्टार्क आणि मिचेल जॉन्सन या पाच गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात उपकर्णधार शेन वॉटसनला दुखापत झाली होती. त्याचा विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांना मुकणार आहे. परंतु भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. फलंदाज उस्मान ख्वाजाही ऑस्ट्रेलियाच्या संघात परतला आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ १२-१३ फेब्रुवारी आणि १६ ते १८ फेब्रुवारी असे दोन सराव सामने चेन्नईत खेळणार आहे. २२ फेब्रुवारीपासून एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ :
मायकेल क्लार्क (कर्णधार), ईडी कोवान, डेव्हिड वॉर्नर, फिल हय़ुजेस, शेन वॉटसन, उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वॅड, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रिक्स, मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, झेव्हियर डोहर्टी आणि जॅक्सन बर्ड.

ऑस्ट्रेलिया घेणार डेनिस लिली यांची मदत
खडतर भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. चार कसोटी सामन्यांच्या भारत दौऱ्यासाठी संघाला मार्गदर्शन करण्यासाठी लिली यांना पाचारण करण्यात येणार आहे. चेन्नईस्थित एमआरएफ पेस फाऊंडेशनचे प्रमुख म्हणून २५ वर्षे कार्यकाळ भूषविलेले ६३ वर्षीय लिली ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजांसाठी सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहेत.