अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून विजय मिळवत भारताने वन-डे मालिका ४-१ अशा फरकाने आपल्या खिशात घातली आहे. या विजयासह भारत आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे मुंबईचा रोहित शर्मा. मुंबईने आपला जोडीदार अजिंक्य रहाणेच्या साथीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताचा विजय सुनिश्चीत केला. रोहितने १२५ धावांची खेळी केली. त्याला अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली.

याआधी ऑस्ट्रेलियाला २४२ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. भक्कम सुरुवातीनंतरही मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. त्यात अक्षर पटेल, बुमराह यांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. वन-डे मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारत कशी कामगिरी करतो आणि ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला टक्कर देतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • मालिका विजयासह आयसीसी वन-डे क्रमवारीत भारत पुन्हा पहिल्या क्रमांकावर
  • भारत ७ गडी राखून विजयी, मालिका ४-१ ने खिशात
  • विजयाची औपचारिकता केदार जाधव आणि मनिष पांडेकडून पूर्ण
  • रोहित शर्माला माघारी धाडण्यात ऑस्ट्रेलियाला यश, १२५ धावांची खेळी करुन शर्मा माघारी
  • आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या सहा हजार धावा पूर्ण
  • रोहित शर्माचं शतक साजरं, भारत विजयाच्या नजिक, वन-डे कारकिर्दीतलं रोहितचं १४ वं शतक
  • दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी, कोहलीचीही रोहित शर्माला उत्तम साथ
  • अजिंक्य माघारी परतल्यानंतर रोहितने विराटच्या साथीने भारताचा डाव सांभाळला
  • भारताची जमलेली जोडी फोडण्यात कांगारुंना यश, अजिंक्य रहाणे माघारी
  • ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत बदल, कुल्टर नाईल गोलंदाजीच्या आक्रमणावर
  • दोघांमध्येही पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची शतकी भागीदारी
  • दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहाणेचं अर्धशतक पूर्ण, भारताची सामन्यावर मजबूत पकड
  • रोहित शर्माचं अर्धशतक, भारताने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • रोहितने सूर पकडला, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल
  • भारतीय संघाचं अर्धशतक फलकावर, कांगारुंचे गोलंदाज हतबल
  • रोहित शर्माची तुलनेने संथ सुरुवात, मात्र रोहितकडूनही रहाणेला भक्कम
  • भारतीय जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात, अजिंक्य रहाणेची सुरुवातीच्या षटकांमध्ये फटकेबाजी
  • ९ गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २४२ धावा, भारतासमोर २४३ धावांचं आव्हान
  • पाठोपाठ कुल्टर नाईलचा त्रिफळा उडवत भुवनेश्वर कुमारचा ऑस्ट्रेलियाला नववा धक्का
  • चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फॉल्करन अखेरच्या षटकात धावबाद
  • भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात चांगली गोलंदाजी, कांगारुंच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी नाकारली
  • वेडला बाद करत बुमराहचा ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का
  • मॅथ्यू वेड आणि जेम्स फॉल्कनरची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी
  • स्टॉयनिसला माघारी धाडण्यात बुमराहला यश, कांगारुंना सहावा धक्का
  • हेडचा त्रिफळा उडवत अक्षर पटेलचा कांगारुंना आणखी एक धक्का, ५ फलंदाज माघारी
  • स्टॉयनिसच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • दोघांमध्येही पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी
  • स्टॉयनिस आणि हेडने कांगारुंचा डाव सावरला
  • अक्षर पटेलचा ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का, पीटर हँडस्कॉंब रहाणेकडे झेल देत माघारी
  • ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरगुंडी, ३ गडी माघारी
  • ठराविक अंतराने अर्धशतकवीर डेव्हीड वॉर्नर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद
  • कर्णधार स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत केदार जाधवचा ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का
  • धावफलक हलता ठेवत वॉर्नरचं अर्धशतक साजरं
  • स्टिव्ह स्मिथच्या साथीने वॉर्नरकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ६६ धावांची भागीदारी
  • हार्दिक पांड्याने फोडली ऑस्ट्रेलियाची जोडी, फिंच माघारी, कांगारुंना पहिला धक्का
  • फिंच, वॉर्नरची सुरेख फटकेबाजी, कांगारुंनी ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • दोन्ही सलामीवीरांकडून ऑस्ट्रेलियाच्या डावाची सावध सुरुवात
  • क्रमवारीत पहिलं स्थान कायम राखण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात विजय आवश्यक
  • मालिकेत भारताचा संघ ३-१ ने आघाडीवर
  • अखेरच्या सामन्यात कांगारुंनी नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय