भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला वन-डे सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी हार पत्करावी लागली. विराट कोहलीच्या भारतीय संघासमोर स्टिव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलियाचा संघ तग धरू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचे हंगामी प्रशिक्षक डेव्हिड सेकर यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या पराभवाचं कारण नमूद केलं आहे. संघातले बरेचसे खेळाडू हे भारताविरुद्ध खेळताना घाबरले होते, त्यांच्यावर मानसिक दबाव असल्यामुळे त्यांना हवीतशी कामगिरी करता आली नसल्याचं सेकर यांनी म्हणलंय.

अवश्य वाचा – भारताची ‘टॉप ऑर्डर’ जगाला हेवा वाटावी अशीच- गावसकर

वन-डे मालिकेत हार पत्करावी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही आपल्या संघाला खडे बोल सुनावले आहेत. आपण ज्या पद्धतीने सराव करतो, तसा खेळ मैदानात करण्याची वेळ आता आलेली असल्याचा इशारा स्मिथने आपल्या सहकाऱ्यांना दिला. संघाच्या कामगिरीबद्दल अधिक बोलताना सेकर म्हणाले, “खेळाडूंच्या वैय्यक्तीक क्षमतेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण भारताविरुद्ध खेळताना आमचे खेळाडू काहीसे घाबरलेले होते, जे आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. प्रत्येक खेळाडूला आपलं म्हणणं मांडण्याची मुभा आहे. पण सतत पराभव पदरी पडला तर तुमच्या खेळात एक नकारात्मकता येते. आमच्या खेळाडूंच्या बाबतीतही नेमकं हेच झाल्याचं सेकर म्हणाले”.

ऑस्ट्रेलियाच्या संघात प्रचंड क्षमता आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ अनेक चांगल्या संघांना मात देऊ शकतो. फक्त खेळाडूंनी आपल्यावरचं मानसिक दडपण झुगारुन देण्याची आवश्यकता असल्याचं, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी नमूद केलं. वन-डे मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आता भारताविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – शेन वॉर्नकडून कुलदीप यादवचं कौतुक, पाकिस्तानी चाहत्यांचा मात्र जळफळाट