ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वन-डे सामन्यात ५ गडी राखून हरवत भारताने मालिका विजयासह आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. यासह कसोटी आणि वन-डे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावण्याची किमया विराट कोहलीच्या भारतीय संघाने साधली आहे.

अवश्य वाचा – इंदूरच्या मैदानावर विक्रमांचा दुहेरी षटकार

प्रत्येक वन-डे आणि टी-२० सामन्यानंतर आयसीसी आपल्या गुणतालिकेत सुधार करते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेऊन भारताने १२० गुणांसह क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या क्रमवारीत भारताने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकलंय. सध्या आफ्रिकेचा संघ ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

अवश्य वाचा – BLOG : खेळपट्टीवर रोहितच्या बॅटिंगचे मॉडेलिंग!

याऊलट कांगारुंची जागतीक क्रमवारीत घसरण सुरुच आहे. सध्या ११४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र इंग्लंडने सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात निर्भेळ यश संपादन केलं तर ते ऑस्ट्रेलियाच्या पुढे जातील. या मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ५-० च्या फरकाने हरवू शकला तर आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात त्याला यश येणार आहे. ५-० ने मालिका जिंकल्यास भारताच्या खात्यात १२२ गुण जमा होतील. तर ४-१ ने विजय मिळवल्यास आपलं पहिलं स्थान कायम राखणं भारतासाठी कठीण होऊन बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वन-डे आणि कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ कमालीच्या फॉर्मात आहे. घरच्या मैदानावर आणि श्रीलंकेत खेळताना भारताने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याचीही संधी दिली नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर भारत कांगारुंविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. यानंतर भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.