इंदूरमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २९४ धावांचं आव्हान दिलं. पहिल्या दोन सामन्यांच्या तुलनेत तिसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे. अॅरोन फिंचचं धडाकेबाज शतक आणि त्याला कर्णधार स्टिव्ह स्मिथने दिलेली उत्तम साथ या जोरावर कांगारुंनी भारतासमोर २९४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात कांगारुंच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. मात्र स्टॉयनिसने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मदत केली.

पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ३०० धावसंख्येचा टप्पा गाठू दिला नाही. मधल्या फळीतला फलंदाज पीटर हँड्सकाँबने डावाची होणारी पडझड थांबवण्यासाठी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मैदानात उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांनाही हा चेंडू सीमारेषेपार षटकार म्हणून जाणार असं वाटलं होतं. मात्र सीमारेषेवर उभ्या असलेल्या मनिष पांडेने चपळाईने हा झेल टिपला.

सलामीवीर अॅरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंदूरच्या वन-डे सामन्यात २९३ धावांची मजल मारली. त्याला कर्णधार स्टिव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही.