भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय प्रकारातही शतकी खेळीसह ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीत विजय मिळवून दिला. 

इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉरगनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र खेळपट्टी गोलंदाजांना साहाय्यकारी असल्याने हा निर्णय ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या पथ्यावर पडला. गुडघ्याच्या दुखापतीतून न सावरल्यामुळे इंग्लंडने जेम्स अँडरसनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान एकादशविरुद्धच्या सराव लढतीत १५७ धावांची खेळी साकारणाऱ्या इयान बेलला भोपळाही फोडता आला नाही. मिचेल स्टार्कने त्याला पायचीत पकडले. त्याच षटकात स्टार्कने जेम्स टेलरलाही शून्यावर बाद केले.
भरवशाचा जो रूट ५ धावा करून तंबूत परतला. मोईन अली २२ धावांवर बाद झाला. कर्णधार मॉरगनने संयमी खेळ करत इंग्लंडचा डाव सावरला. मॉरगनने जोस बटलरच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. त्याने आठव्या विकेटसाठी ख्रिस जॉर्डनच्या साथीने ५६ धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला दोनशेचा टप्पा ओलांडता आला.
अन्य सहकारी एकामागोमाग एक बाद होत असताना मॉरगनने चिवटपणे खेळ करत शतकी खेळी साकारली. जेम्स फॉल्कनरच्या गोलंदाजीवर चौकार खेचत मॉरगनने आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात मॉरगन बाद झाला. त्याने ११ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्य़ाने १२१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने ४२ धावांत ४ बळी तर जेम्स फॉल्कनरने ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना डेव्हिड वॉर्नर-आरोन फिंच जोडीने ३३ धावांची सलामी दिली. फिंच १५ तर शेन वॉटसन १६ धावांवर बाद झाला. वॉर्नरने तिसऱ्या विकेटसाठी स्टिव्हन स्मिथच्या साथीने ८७ धावांची भागीदारी केली. स्मिथ ३७ धावांवर बाद झाला. सातत्याने सहकारी बाद होत असतानाही वॉर्नरने मुक्तपणे फटकेबाजी करत धावगती कायम राखली.
मोईन अलीच्या गोलंदाजीवर चौकार लगावत वॉर्नरने आपले शतक पूर्ण केले. त्याने १८ चौकारांसह १२७ धावांची सुरेख खेळी साकारली.
४० षटकांच्या आत विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने बोनस गुणही पटकावला. ४ बळींसह विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टार्कला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

धावफलक
इंग्लंड : इयान बेल पायचीत गो. स्टार्क ०, मोईन अली झे. मॅक्सवेल गो. फॉल्कनर २२, जेम्स टेलर पायचीत गो. स्टार्क ०, जो रुट झे. वॉटसन गो. कमिन्स ५, ईऑन मॉरगन झे. मॅक्सवेल गो. स्टार्क १२१, रवी बोपारा झे. मॅक्सवेल गो. डोहर्टी १३, जोस बटलर झे. वॉर्नर गो. फॉल्कनर २८, ख्रिस वोक्स झे. स्मिथ, गो. मॅक्सवेल ८, ख्रिस जॉर्डन झे. मॅक्सवेल गो. फॉल्कनर १७, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ०, स्टिव्हन फिन त्रि.गो. स्टार्क ०,
अवांतर (बाइज २, लेगबाइज ३, वाइड १४, नोबॉल १) २०
एकूण ४७.५ षटकांत सर्वबाद २३४
बादक्रम : १-०, २-०, ३-१२, ४-३३, ५-६९, ६-१३६, ७-१६८, ८-२२४, ९-२३४, १०-२३४.
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ८.५-०-४२-४, पॅट कमिन्स ९-१-४२-१, शेन वॉटसन ४-०-२३-०, जेम्स फॉल्कनर १०-१-४७-३, ग्लेन मॅक्सवेल ६-०-३७-१, झेव्हियर डोहर्टी १०-०-३८-१
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. बेल गो. वोक्स १२७, आरोन फिंच त्रि.गो. वोक्स १५, शेन वॉटसन झे. वोक्स गो. जॉर्डन १६, स्टिव्हन स्मिथ त्रि.गो. अली ३७, जॉर्ज बेली झे. बटलर गो. वोक्स १०, ग्लेन मॅक्सवेल झे. बटलर गो. वोक्स ०, ब्रॅड हॅडिन धावचीत १६, जेम्स फॉल्कनर नाबाद ६, मिचेल स्टार्क नाबाद ०
अवांतर (लेगबाइज ७, वाइड १) ८
एकूण ३९.५ षटकांत ७ बाद २३५
बादक्रम : १-३३, २-७१, ३-१५८, ४-१९९, ५-२००, ६-२२७, ७-२३३
गोलंदाजी : ख्रिस वोक्स ८-१-४०-४, स्टिव्हन फिन ८-१-४८-०, स्टुअर्ट ब्रॉड ६.५-०-४९-०, ख्रिस जॉर्डन ६-०-३३-१, मोईन अली ९-०-४५-१, रवी बोपारा २-०-१३-०
सामनावीर : मिचेल स्टार्क
गुण : ऑस्ट्रेलिया ५, इंग्लंड ०