अ‍ॅडम व्होग्सने विक्रमी द्विशतक साकारून ऑस्ट्रेलियाला पहिल्या कसोटी सामन्यात वरचष्मा मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५६२ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर न्यूझीलंडची तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७८ अशी अवस्था झाली. किवी संघ अजून २०१ धावांनी पिछाडीवर असून, खेळ थांबला तेव्हा कसोटी पदार्पणवीर हेन्री निकोल्स ३१ धावांवर खेळत आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलमला मिचेल मार्शने पायचीत केले. त्याने केवळ १० धावा केल्या. व्होग्सने सकाळी १७६ धावांवरून आपल्या डावाला प्रारंभ केला आणि त्यात ६३ धावांची भर घातली. त्याने ५०४ मिनिटे आणि ३६४ चेंडू मैदानावर उभे राहात ३० चौकार आणि ३ षटकारांसह आपली २३९ धावांची खेळी साकारली. मार्क क्रेगने स्वत:च्याच चेंडूवर व्होग्सचा अप्रतिम झेल टिपला आणि एका मॅरेथॉन खेळीपुढे पूर्णविराम दिला.