ब्रेंडन मॅक्क्युलमच्या घणाघाती शतकाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ आणि जो बर्न्‍स यांच्या दिमाखदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दमदार प्रत्युत्तर दिले. न्यूझीलंडला ३७० धावांत गुंडाळलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३६३ अशी मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ ७ धावांनी पिछाडीवर असून, अ‍ॅडम व्होग्स २ तर नॅथन लियॉन ४ धावांवर खेळत आहेत.
१ बाद ५७ वरुन ऑस्ट्रेलियाने पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र कालच्या धावसंख्येत सहा धावांची भर घालून उस्मान ख्वाजा तंबूत परतला. ट्रेंट बोल्टने त्याला मॅक्क्युलमकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने २४ धावा केल्या. २ बाद ६७ अशा स्थितीतून जो बर्न्‍स आणि स्टीव्हन स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी २८९ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सुरेख सांगड घालत या जोडीने धावफलक हलता ठेवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत या जोडीने पडझड थांबवली आणि मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला. गेल्या काही सामन्यांत मोठी खेळी करू न शकणाऱ्या बर्न्‍सने मॉट हेन्रीच्या गोलंदाजीवर चौकार लगावत कारकीर्दीतील तिसरे शतक झळकावले. सुरुवातीला सावधपणे खेळणाऱ्या स्मिथने खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर चौफैर फटकेबाजी केली. बोल्टच्या गोलंदाजीवर चौकारासह स्मिथने कारकीर्दीतील चौदावे शतक झळकावले. गेल्या वर्षभरात आणि कर्णधारपद स्वीकारल्यापासून झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या स्मिथने आपल्या सुरेख खेळीसह संघाला संकटातून बाहेर काढले.
शतकानंतर बर्न्‍सने अधिक आक्रमक पवित्रा स्वीकारला. हे दोघे नाबाद राहणार असे चित्र असताना, दिवसाचा खेळ संपण्यासाठी पाच षटके बाकी असताना नील व्ॉगनरने बर्न्‍सला बाद केले. त्याने २० चौकारांसह १७० धावांची खेळी साकारली. वॉगनरच्या उसळत्या चेंडूवर पूल करण्याचा स्मिथचा प्रयत्न फसला आणि गप्तीलने त्याचा झेल टिपला. स्मिथने १७ चौकारांसह १३८ धावा केल्या. व्होग्स आणि लियॉन जोडीने संयमी खेळी करत उर्वरित षटके खेळून काढली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड ३७० विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ४ बाद ३६३ (जो बर्न्‍स १७०, स्टीव्हन स्मिथ १३८, नील व्ॉगनर २/६३)

उसळता चेंडू आणि चुकलेला ठोका
ख्राइस्टचर्च कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, नील व्ॉगनरचा चेंडू स्टीव्हन स्मिथच्या डोक्याच्या मागच्या बाजूवर आदळला आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ७८ वर खेळणारा स्मिथ त्या आघाताने खाली कोसळला. योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाचे बहुतांशी खेळाडू अतिरिक्त सुरक्षा कवच असलेले हेल्मेट घालतात. मात्र स्मिथ नेहमीच्या हेल्मेटसह खेळत होता. ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू फिलीप ह्य़ुजचे उसळता चेंडू लागूनच निधन झाले होते. त्या आठवणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या मनात ताज्या आहेत. या अपघातानंतर त्याचा सहकारी जो बर्न्‍स आणि न्यूझीलंडचा संपूर्ण संघ स्मिथच्या दिशेने धावला. व्ॉगनरने स्मिथची विचारपूस केली. आपण ठीक असल्याचे स्मिथने सांगताच सगळ्यांनीच निश्वास सोडला. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे फिजिओ आणि डॉक्टरांनी स्मिथवर उपचार केले.