सिडनी : मार्नस लबूशेनने २०२० या नववर्षांचा प्रारंभसुद्धा शानदार शतकानिशी केला आहे. सलग पाचव्या कसोटी सामन्यात चौथे शतक झळकावण्याची किमया साधणाऱ्या लबूशेनमुळेच ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ३ बाद २८३ अशी दमदार मजल मारली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत गतवर्षी कसोटी क्रिकेटमध्ये ६४.९४च्या सरासरीने सर्वाधिक ११०४ धावा काढणाऱ्या लबूशेनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरे शतक नोंदवले. त्याला स्टीव्ह स्मिथने (६३) अप्रतिम साथ दिली. लबूशेन आणि स्मिथ यांनी तिसऱ्या गडय़ासाठी १५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. लबूशेन १३० धावांवर (२१० चेंडूंत १२ चौकार आणि एक षटकारासह) आणि मॅथ्यू वेड २२ धावांवर खेळत आहे.

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या आणि ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लबूशेनने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सात कसोटी डावांमध्ये चार शतके झळकावली आहेत. न्यूझीलंडचा संघ कर्णधार केन विल्यम्सनशिवाय या सामन्यात खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद २८३ (मार्नस लबूशेन खेळत आहे १३०, स्टीव्ह स्मिथ ६३; कॉलिन डी ग्रँडहोमी २/६३)