News Flash

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : स्मिथची शतकाच्या दिशेने आगेकूच

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५७ धावा केल्या असून स्मिथने शतकाच्या दिशेने कूच केले आहे

स्टीव्ह स्मिथ ७७* चेंडू १९२ चौकार ८ षटकार १

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २५७; लबूशेनचे दमदार अर्धशतक

मेलबर्न : कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी विराजमान असलेल्या स्टीव्ह स्मिथने (खेळत आहे ७७) साकारलेल्या दमदार अर्धशतकाला मार्नस लबूशेनची (६३) अप्रतिम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५७ धावा केल्या असून स्मिथने शतकाच्या दिशेने कूच केले आहे, तर ट्रेव्हिस हेड २५ धावांवर खेळत आहे.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने जो बर्न्‍स (०) आणि डेव्हिड वॉर्नर (४१) यांना लवकर गमावले. परंतु लबूशेन आणि स्मिथ यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८३ धावांची भागीदारी रचून संघाला सावरले. लबूशेनला सलग चौथे शतक झळकावण्याची संधी होती, मात्र सहा चौकार आणि एका षटकारासह ६३ धावा काढून तो दुर्दैवीरीत्या त्रिफळाचीत झाला. मग मॅथ्यू वेड (३८) धावा करून माघारी परतला.

या सामन्यादरम्यान स्मिथची मायदेशातील तसेच न्यूझीलंडच्या काही चाहत्यांकडून चेंडू फेरफार प्रकरणामुळे हुर्योसुद्धा उडवण्यात आली. परंतु स्मिथने लक्ष विचलित न होऊ देता एक बाजू लावून धरत कारकीर्दीतील २८वे अर्धशतक झळकावले.

पहिल्या दिवसाला चाहत्यांचा विक्रमी प्रतिसाद

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पहिल्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी तब्बल ८०,४७३ चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. गेल्या ४४ वर्षांत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द्विराष्ट्रीय मालिकेतील ‘बॉक्सिंग डे’ सामन्यासाठी दुसऱ्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर चाहत्यांनी हजेरी दर्शवली. यापूर्वी १९७५मध्ये ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज यांच्यातील लढतीसाठी तब्बल ८५,६६१ प्रेक्षक उपस्थित होते. मात्र एखाद्या कसोटी सामन्यासाठी सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा विक्रम हा २०१३च्या अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात (९१,११२ हजार) नोंदवण्यात आला आहे.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९० षटकांत ४ बाद २५७ (स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ७७, मार्नस लबूशेन ६३; कॉलिन डी ग्रँडहोम २/४८)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:05 am

Web Title: australia v new zealand steve smith half century puts australia in control zws 70
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रेल्वेकडे १५२ धावांची आघाडी ; कर्ण शर्माचे झुंजार शतक
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्रापुढे आघाडी मिळवण्याचे आव्हान
3 देवांग गांधी यांना ड्रेसिंगरूममध्ये अनधिकृत प्रवेश भोवला
Just Now!
X