ख्राइस्टचर्चला झालेल्या भूकंपाला सोमवारी पाच वष्रे पूर्ण झाली. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यासाठी हा तसा भावनिक दिवस. मात्र त्यांचा लाडका संघनायक ब्रेंडन मॅक्क्युलमच्या १०१व्या आणि अखेरच्या कसोटीतील अखेरचा डावसुद्धा याच दिवशी क्रिकेटरसिकांनी अनुभवला. शेवटच्या खेळीत २५ धावांवर बाद होऊन परतत असताना क्रिकेटरसिकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. ब्रेंडनची अखेरची खेळी अल्पायुषी ठरली, तर ऑस्ट्रेलियाने ख्राइस्टचर्चच्या दुसऱ्या कसोटीवरील पकड घट्ट केली आहे.
तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची दुसऱ्या डावात ४ बाद १२१ अशी अवस्था झाली आहे आणि पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी त्यांना १४ धावा हव्या आहेत. न्यूझीलंडची ३ बाद ७२ अशी स्थिती असताना ब्रेंडन मैदानावर आला. पहिल्या डावात कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम साकारणाऱ्या ब्रेंडनचा दुसऱ्या डावातील आवेशही तसाच होता. फक्त २७ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह २५ धावा त्याने केल्या. न्यूझीलंडच्या डावातील ३५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ब्रेंडनने जोश हॅझलवूडला स्क्वेअर लेगच्या दिशेने दिमाखात षटकार ठोकला. यासह कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त षटकारांचा विश्वविक्रमी आकडा १०७पर्यंत त्याने उंचावला. मात्र हॅझलवूडच्या पुढच्याच चेंडूवर तशाच प्रकारे चेंडू फटकावण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि डेव्हिड वॉर्नरने त्याचा सुरेख झेल टिपला. तो बाद झाला त्या वेळी न्यूझीलंडच्या धावसंख्येत ३३ धावांची भर पडली होती, मात्र त्यापैकी २५ धावा ब्रेंडनच्या होत्या. ब्रेंडन बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथने जवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याच्या क्रिकेटमधील योगदानाचे कौतुक केले.
ब्रेंडनने पहिल्या डावात फक्त ५४ चेंडूंत शतक झळकावले आणि १४५ धावांची झुंजार खेळी साकारून अखेरच्या कसोटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव, हे सूत्र त्याने अखेपर्यंत जोपासले. खेळ थांबला तेव्हा केन विल्यम्सन आणि कोरे अँडरसन अनुक्रमे ४५ आणि ९ धावांवर खेळत होते.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : ३७०
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १५३.१ षटकांत सर्व बाद ५०५ (जो बर्न्‍स १७०, स्टीव्हन स्मिथ १३८; नील व्ॉगनर ६/१०६, ट्रेंट बोल्ट २/१०८)न्यूझीलंड (दुसरा डाव) : ४४ षटकांत ४ बाद १२१ (केन विल्यम्सन खेळत आहे ४५, टॉम लॅथम ३९; जेम्स पॅटिन्सन ३/२९)