भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा असणार आहे. भारताच्या काही माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात कशी रणनीती असावी याबाबतचे सल्लेही दिले आहेत. यातच आता अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या दिग्गजांनीही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराभव करण्यासाठी गुरुमंत्र दिला आहे. या दोन्ही दिग्गजांची मतं वेगवेगळी असली तरी यातून भारतीय संघाला विजयाची गुरुकिल्ली नक्कीच मिळेल.
कुंबळेचा सल्ला –
कसोटी मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताने वर्चस्व गाजवणे गरजेचे आहे. कोहली ही एकमेव कसोटीच खेळणार असल्याने मायदेशी परतण्यापूर्वी तो संघाला कशा प्रकारे दिशा दाखवतो, हे महत्त्वपूर्ण ठरेल. दोन वर्षांपूर्वीसुद्धा भारताने पहिली कसोटी जिंकून त्यानंतर मालिकेत २-१ असे यश संपादन केले. त्यावेळच्या तुलनेत आताचा ऑस्ट्रेलियन संघ अधिक भक्कम असल्याने भारताने पहिला सामना किमान अनिर्णीत राखणेदेखील मोठी गोष्ट ठरेल. त्यामुळे हा सामना जिंकून भारताने उर्वरित मालिकेसाठी पायाभरणी करावी. त्याशिवाय भारताचे गोलंदाज यावेळीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हैराण करतील.
द्रविडनं काय दिला गुरुमंत्र?
कसोटी मालिकेसाठी राहुल द्रविडनं सर्वात महत्वाचा सल्ला दिला आहे. द्रविड म्हणाला की, या कसोटी मालिकेसाठी पुजाराप्रमाणे मैदानावर स्थिरावून संयमानं फलंदाजी केली पाहिजे. त्यावेळी आपला विजय सुकर होईल. गेल्या दौऱ्यात पुजारानं संयमी फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. पुजाराच्या तीन शतकांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:51 pm