पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने Concussion Substitute नियमाचा वापर करत दुखापतग्रस्त जाडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संधी दिली. ऑस्ट्रेलियाने चहलला बदली खेळाडू म्हणून खेळवण्यावर आक्षेप घेतला होता. माजी खेळाडूंनी यावर आक्षेप घेत विविध वक्तव्य केली होती. पण आता दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं Concussion Substitute या नियमांचा वापर करत बदली खेळाडूला संघात स्थान दिल्याचा प्रकार घडला आहे.

भारतीय संघाविरोधात सुरु असलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळणाऱ्या कॅमरुन ग्रीनच्या जागी पॅट्रिक रॉव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. गोलंदाजी करत असताना ग्रीनच्या डोक्याला बुमराहनं मारलेला चेंडू लागला होता. त्यानंतर कनकशनच्या नियमांच्या आधार घेत ऑस्ट्रेलियानं ग्रीनऐवजी पॅट्रिकला संघात घेतलं. कॅमरुन ग्रीन दुसऱ्या सराव सामन्यातून बाहेर गेला आहे.

सिडनी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ही घटना घडली. भारतीय संघाकडून बुमराह फलंदाजी करत होता. बुमराहनं मारलेला एक फटका ग्रीनच्या तोंडावर लागला. ग्रीनला थोडं कनकशन झाल्यामुळे सामन्यातून त्याला बाहेर काढण्यात आलं. ग्रीनच्या जागी बदली खेळाडू म्हणून पॅट्रिक रॉव याचा समावेश करण्यात आला. सराव सामन्यातील उर्वरीत दोन्ही दिवशी ग्रीन खेळणार नाही. चेंडू लागल्यानंतर ग्रीन तात्काळ ड्रेसिंग रुममध्ये परतला होता.

पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पुकोव्सकी याच्या हेल्मटला कार्तिक त्यागीचा चेंडू लागला होता. पुकोव्सकीलाही कनकशन झालं होतं.

कॅमरुन ग्रीन आणि पुकोव्सकी पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? हे अद्याप अस्पष्टच आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर दोघांच्या प्रकृतीची नियमीत काळजी घेत आहेत. त्यांच्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. दोघेही संघातून बाहेर गेल्यास ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे याआधीच डेव्हिड वॉर्नरनं पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे.