ऑस्ट्रेलियासोबतच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने कडवी झुंज देत सामना अनिर्णित राखला. सिडनीत झालेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी झालेल्या वर्णभेदात्मक टिप्पणी या परिस्थितीत कसोटी वाचवण्याचं आव्हान असताना ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत ऑस्ट्रेलियाला अनपेक्षित धक्के दिले. त्यानंतर हनुमा विहारी आणि आर अश्विन यांनी पाचव्या दिवशीचे संपूर्ण तिसरं सत्र खेळून कसोटी अनिर्णित राखली.

भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला सामना संपल्यानंतरचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जबरदस्त कामगिरी केल्यानतर हनुमा विहारी आणि आर अश्विन ड्रेसिंग रुममध्ये येताना दिसत आहेत. ‘सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील ऐतिहासिक सामन्यानंतर आम्ही तुमच्यासाठी ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ आणला आहे’ असं कॅप्शन पोस्टसोबत देण्यात आली आहे.

आणखी वाचा- “सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी अश्विनला सरळ उभंही राहता येत नव्हतं”, पत्नीने केली इमोशनल पोस्ट

व्हिडीओमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे सर्वात प्रथम येत हनुमा विहारी आणि आर अश्विन यांचं अभिनंदन करताना दिसत आहे. व्हिडीओत रोहित शर्मा तसंच इतर खेळाडूही यानंतर एकमेकांचं अभिनंदन करत आहेत.

सामना संपल्यानंतर भारतीय संघाची प्रतिक्रिया दाखवणारा व्हिडीओ Cricket.com.au नेही शेअर केला आहे. यामध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री सर्वांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. व्हिडीओत अजिंक्य रहाणे, सिराज, बुमराह इतर खेळाडूही मोलाची कामगिरी निभावणाऱ्या हनुमा विहारी आणि अश्विनचं मैदानात येऊन कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

आणखी वाचा- भारतीय संघाने संयमी खेळीतून द्रविडला दिलं अविस्मरणीय बर्थडे गिफ्ट; आज ‘हे’ तीन खेळाडू ठरले ‘द वॉल’

विजयासाठीचं ४०७ धावांचं उद्धिष्ट गाठताना भारताचा आधारस्तंभ चेतेश्वर पुजारा आणि पंत यांनी १४८ धावांची खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यानंतर आर अश्विन आणि विहारी यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडत कसोटी अनिर्णित राखली. चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.