ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथनं भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आहे. दोघांनी २५ चेंडूत ५७ धावा चोपल्या. यामध्ये मॅक्सवेलनं फक्त १९ चेंडूत ४५ धावांची तुफानी खेळी केली तर स्मिथनं ६ चेंडूत ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना फिंच (११४), वॉर्नर (६९) आणि स्मिथ (१०५) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ३७४ धावांचा टप्पा ओलांडला आहे. स्मिथनं ६२ चेंडूत तुफानी शतकी खेळी केली.

मॅक्सवेल आणि स्मिथनं चौथ्या विकेटसाठी २५ चेंडूत झटपट ५७ धावांची भागिदारी केली आहे. मॅक्सवेलनं आपल्या तुफानी खेळीत पाच चौकार आणि तीन गगनचुंबी षटकार लगावले. मोहमद्द शामीनं जाडेजाकरवी ४५ चेंडूवर मॅक्सवेलला बाद केलं. आयपीएलमध्ये अपयशी ठरणाऱ्या मॅक्सवेलनं टी-२० स्टाइल फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसं काढली.

फिंच आणि वॉर्नरनं १५६ धावांची सलामी भागिदारी केली आहे. त्यानंतर स्मिथ आणि फिंच यांनी १०८ धावांची भागिदारी करत धावसंख्या वाढवली. भारताकडून शामीनं तीन तर बुमराह, चहल आणि जाडेजानं प्रत्येकी एक-एक बळी घेतला आहे. भारताकडून चहल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. चहलनं दहा षटकांत ८९ धावा दिल्या आहेत. चहलच्या १० षटकात ५ षटकार आणि पाच चौकार लगावले आहेत.