तिरंगी स्पर्धेत पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पदरी पडल्यामुळे भारताला जर अंतिम फेरी गाठायची असेल तर भारतापुढे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असाच असेल. हा सामना जर भारताने जिंकला तरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील, पण भारताने हा सामना गमावला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये तळ ठोकून राहिलेल्या भारतासाठी हा सामना अति महत्त्वाचा असेल.
भारताच्या फलंदाजांना अजूनही स्पर्धेत सूर गवसलेला नाही आणि ही संघासाठी चिंतेची बाब असेल. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती, पण दुसऱ्या सामन्यात त्याला वगळल्यानंतर भारतीय संघ १५३ धावांमध्ये तंबूत परतला होता. सलामीवीर शिखर धवनला या मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीला संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायचा निर्णय घेतला असून त्यामध्ये अजूनही यश आलेले नाही. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला जास्त धावा करता आलेल्या नाहीत. अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू आणि सुरेश रैना यांच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अजूनही लय सापडलेली दिसत नाही. स्टुअर्ट बिन्नीने दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचा चांगला फायदा उचलला असून त्याच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची संघाला अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये भारताने निराशाच केलेली आहे. भारताला खास करून वेगवान गोलंदाजीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने सहजपणे जिंकले आहेत. मायकल क्लार्कच्या पुनरागमनाने संघ नक्कीच अधिक बळकट होईल. फलंदाजीमध्ये स्टीव्हन स्मिथ हा भन्नाट फॉर्मात आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शेन वॉटसनही चांगल्या फॉर्मात आहेत. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क सातत्यपूर्ण वेगवान मारा करण्यात यशस्वी ठरलेला आहे. मिचेल जॉन्सन आणि जोश हॅझेलवूड यांचे संघात पुनरागमन होत असून त्यामुळे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी अधिक भेदक होऊ शकते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा.
ऑस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, आरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), जोश हॅझेलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, गुरिंदर संधू, मोइसेस हेनरिक्स आणि शॉन मार्श.
सामन्याची वेळ : सकाळी ८.५० मि.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३ वाहिनीवर.