ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सिडनीच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर मॅट रेनशॉ या युवा खेळाडूने दमदार शतकी कामगिरी केली. पण या खेळीदरम्यान, मोठी दुखापत होताना रेनशॉ बचावला. रेनशॉ ९१ धावांवर खेळत असताना, पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचा चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्या आघाताने बिथरून गेलेला रेनशॉ खाली मैदानात कोसळल्याने क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. क्षणार्धात उपस्थितांना फिल ह्युजच्या प्रकरणाची आठवण झाली. कारण सिडनीच्या याच मैदानात दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेफिल्ड सामन्यात फिल ह्यूजच्या डोक्यावर चेंडू आदळून त्याचा दुर्दैवी अंत झाला होता. पण मॅट रेनशॉ काही क्षणांतच स्वत:च्या पायावर उठून उभा राहिला आणि त्याने आपले शतक देखील पूर्ण केले. रेनशॉने पहिल्या दिवसाच्या अखेरीस नाबाद १६७ धावा केल्या आहेत.
दरम्यान, याच कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवर डेव्हिड वॉर्नरने विक्रमी शतक ठोकले. वॉर्नरने पहिल्या दिवसाच्या उपहारापूर्वीच केवळ ७८ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला. अशी किमया करणारा वॉर्नर हा जगातील पाचवा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला.