असीला गुणरत्नेने धडाकेबाज ८४ धावांची खेळी साकारून श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवून दिला. गुणरत्नेने अ‍ॅन्ड्रय़ू टायच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याचप्रमाणे तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली.

गुणरत्नेने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ४६ चेंडूंत आपली खेळी साकारली.

श्रीलंकेने फक्त दोन विकेट्स राखून हा विजय साकारला. श्रीलंकेने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातही अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला होता. त्या वेळी चमरा कपुगेदराने चौकार मारला होता.

चार षटके शिल्लक असताना श्रीलंकेला ५२ धावांची आवश्यकता होती. त्या वेळी गुणरत्नेने मोझेस हेन्रिक्सच्या गोलंदाजीवर तीन सलग षटकार आणि एक चौकार खेचला. मग टायच्या शेवटच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकून विजयात सिंहाचा वाटा उचलला.

दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक विजय

हॅमिल्टन : दक्षिण आफ्रिकेचा संघ कचखाऊ वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हा शिक्का पुसून टाकत त्यांनी चार विकेट्स राखून रोमहर्षक विजय मिळवण्याची किमया साधली. ६४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६९ धावांची खेळी साकारणारा क्विंटन डी कॉक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

टीम साऊदीच्या अखेरीच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती. अँडिले फेहलुक्वायोने दुसऱ्याच चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने षटकार खेचून आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या. मग पाचव्या चेंडूवर ए बी डी’व्हिलियर्सने मिडऑफला चौकार मारून एक चेंडू शिल्लक असतानाच विजयावर शिक्कामोर्तब केले. डी’व्हिलियर्सने ३ चौकारांसह ३७ धावा केल्या, तर फेहलुक्वायोने २३ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांनिशी २९ धावा केल्या. या जोडीने सातव्या विकेटसाठी ७.१ षटकांत नाबाद ५४ धावांची भागीदारी रचली.

त्याआधी, पावसामुळे हा सामना ३४ षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने ७ बाद २०७ धावा केल्या. यात केन विल्यमसन (५९) आणि डीन ब्राऊनली (३१) यांचे प्रमुख योगदान होते. अखेरच्या षटकांमध्ये कॉलिन डी ग्रँडहोमी (३४*) आणि टीम साऊदी (२४*) यांनी वेगाने धावा काढल्या. ख्रिस मॉरिसने ६२ धावांत ४ बळी घेतले.