भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २७ नोव्हेंबर पासून या क्रिकेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे. करोनानंतर हा भारताचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याने सर्वांचंच लक्ष हा दौऱ्याकडे लागलेलं आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून अनेक नव्या चेहऱ्यांसह काही अनुभवी खेळाडूंना संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. याचसोबत समालोचन कक्षातदेखील पुन्हा एकदा अस्सल मुंबईकर आवाज ऐकायला मिळणार आहे. वादग्रस्त कारणामुळे समालोचन कक्षातून वगळण्यात आलेले संजय मांजरेकर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत.

मार्च महिन्यापासून संजय मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनेलमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. भारत-आफ्रिका मालिका सुरू होण्याच्या काही काळ आधी त्यांना समालोचन समितीतून वगळण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यासाठी ते धरमशाला येथे गेले नव्हते त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला होता. IPL सुरू होण्याआधी दोन वेळा मांजरेकर यांनी BCCI ला पत्र लिहून पुन्हा समालोचन समितीत त्यांचा समावेश करण्याबाबत विनंती केली होती. पण त्यावेळी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान पदाचे अधिकार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे आहेत, त्यामुळे समालोचक निवडण्याचे अधिकार त्यांच्याकडे असणार आहेत. त्यामुळे समालोचन समितीत मांजरेकर यांची वर्णी लागल्याची शक्यता आहे.

२०१९मध्ये मांजरेकर यांनी भारतीय खेळाडूंबद्दल टिपण्णी केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना समालोचन समितीतून वगळण्यात आलं. परंतु आता संजय मांजरेकर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समालोचन कक्षातून पुनरागमन करण्यास सज्ज आहेत. मांजरेकरांसह ग्लेन मॅकग्रा, निक नाईट, हर्षा भोगले, अजय जाडेजा, मुरली कार्तिक आणि अजित आगरकर हे माजी खेळाडूदेखील समालोचन कक्षात असणार आहेत.

याशिवाय, विरेंद्र सेहवागदेखील हिंदी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहे. त्याच्यासह झहीर खान, विजय दहीया, मोहम्मद कैफ, विवेक राजदान आणि अर्जुन पंडीत हेदेखील हिंदी समालोचन करताना दिसणार आहे.