01 December 2020

News Flash

अब आयेगा मजा!

कसोटी क्रिकेट म्हणजे पाच दिवसांचा नीरस, कंटाळवाणा आणि बहुतांशी अनिर्णीत अवस्थेत समाधान मानणारा खेळ. ही व्याख्या आता कालबाह्य झाली आहे, याचीच प्रचीती भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी

| January 10, 2015 12:33 pm

कसोटी क्रिकेट म्हणजे पाच दिवसांचा नीरस, कंटाळवाणा आणि बहुतांशी अनिर्णीत अवस्थेत समाधान मानणारा खेळ. ही व्याख्या आता कालबाह्य झाली आहे, याचीच प्रचीती भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीत येत आहे. तीन कसोटी जिंकून बोर्डर-गावस्कर चषकावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता चौथी कसोटी जिंकण्याचे मनसुबे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने आक्रमक पद्धतीने आखले आहेत. शुक्रवारी चौथ्या दिवशी चहापानानंतरच्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना तुफानी चोप देत तब्बल २१३ धावा काढल्या. त्यामुळे सुमारे साडेतीनशे धावांची भरभक्कम आघाडी ऑस्ट्रेलियाकडे जमा झाल्यामुळे भारताला अखेरच्या दिवशी कसोटी जिंकण्यासाठी एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेटचा राजमार्ग स्वीकारावा लागणार आहे, अन्यथा कसोटी वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वेगाने खेळत ४० षटकांत ६ बाद २५१ धावा केल्या आहेत आणि एकंदर आघाडी ३४८ धावांपर्यंत वाढवली आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा संघ याच धावसंख्येवर आपला डाव घोषित करण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज उमेश यादववर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवून त्याच्या तीन षटकांत ४५ धावा केल्या. आर. अश्विनने परदेशातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना चार बळी घेतले, परंतु त्यासाठी १०५ धावा मोजल्या.
त्याआधी, ५ बाद ३४२ धावसंख्येवरून भारताने आपला पहिला डाव पुढे सुरू केला. सकाळच्या पाचव्याच षटकात कर्णधार विराट कोहली (१४७) माघारी परतला. परंतु भारतापुढे फॉलोऑनचे संकट होते. मग आर. अश्विन (५०), वृद्धिमान साहा (३५) आणि भुवनेश्वर कुमार (३०) या तळाच्या फलंदाजांनी हिंमतीने फलंदाजी केली.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या खेळपट्टीवर अश्विनला छान साथ मिळाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लिऑन भारतीय फलंदाजांचा कर्दनकाळ ठरू शकेल. या मैदानावर चौथ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक २८८ धावांचे लक्ष्य पार केले आहे. २००६मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम दाखवला होता. परदेशी संघाचे उदाहरण द्यायचे झाल्यास इंग्लंडने १९४ धावांचे आव्हान पेलले होते.
अश्विनला चांगले यश मिळत होते, परंतु ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा धावांचा प्रवाह मात्र अखंड सुरू होता. कर्णधार स्मिथने ७१ धावांची खेळी साकारली. याशिवाय सलामीवीर ख्रिस रॉजर्स (५६) आणि जो बर्न्‍स (६६) यांनी अर्धशतके झळकावली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ब्रॅड हॅडिन ३१ धावांवर खेळत होता, तर रयान हॅरिसने आपले खाते अद्याप उघडलेले नाही.
स्मिथने आपली आणखी महत्त्वपूर्ण खेळी साकारताना भारताविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक एकूण धावांचा विक्रम मोडीत काढला. १९४७-४८मध्ये सर डॉन ब्रॅडमन यांनी भारताविरुद्ध ७१५ धावा केल्या होत्या.

आम्ही बऱ्याच धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगले फटके खेळून धावा जमवल्या. नव्या चेंडूनिशी आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. ही कामगिरी चांगली झाली असती तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. ज्या पद्धतीने चेंडू वळत होता, ते पाहता आम्ही आणखी दडपण आणू शकलो असतो. मात्र तसे झाले नाही. मात्र तरीही सामना रंगतदार अवस्थेत आहे. अ‍ॅडलेडप्रमाणे धावांचा पाठलाग करण्याचा आमचा प्रयत्न असेल. खेळपट्टीवर स्थिरावण्याचा माझा प्रयत्न होता. योजनांनुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजूने शिस्तबद्ध गोलंदाजीची साथ मिळाली असती तर ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखले असते.
-रविचंद्रन अश्विन, भारताचा फिरकीपटू

शेवटच्या दिवशी फिरकीपटूंची भूमिका निर्णायक राहणार आहे. चेंडू वळतो आहे, खेळपट्टीवर भेगा आणखी रुंद होत आहेत. त्यामुळे फिरकीपटूंसाठी आदर्श अशी ही खेळपट्टी झाली आहे. पाचव्या दिवशी सर्वोत्तम प्रदर्शन करत सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. असाधारण उसळी आणि रिव्हर्स स्विंग आम्ही अनुभवले. भारतीय फलंदाजांनाही त्याचा सामना करावा लागणार आहे. डाव घोषित करण्याविषयी निश्चित सांगता येणार नाही. स्टिव्हन स्मिथ योग्य निर्णय घेईल. दोन्ही डावात अर्धशतक झळकावता आल्याचे समाधान आहे. स्मिथने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. जास्तीतजास्त धावा करण्याचा आमचा इरादा होता आणि म्हणूनच भक्कम आघाडी मिळवू शकलो.
– जो बर्न्‍स, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू

अश्विनचा अष्टपैलू विक्रम
रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० बळी मिळवण्याचा विक्रम नावावर केला. हा विक्रम करणारा अश्विन नववा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कमीत कमी कसोटीत हा विक्रम नोंदवणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीमध्ये आता अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने २४व्या कसोटीत हा विक्रम रचला. इयान बोथमने २१व्या तर विनू मंकड यांनी २३व्या कसोटीत हा विक्रम नोंदवला होता.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) :  ७ बाद ५७२ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. हॅडिन गो. स्टार्क ०, लोकेश राहुल झे. आणि गो. स्टार्क ११०, रोहित शर्मा त्रि. गो. लिऑन ५३, विराट कोहली झे. रॉजर्स गो. हॅरिस १४७, अजिंक्य रहाणे पायचीत गो. वॉटसन १३, सुरेश रैना झे. हॅडिन गो. वॉटसन ०, वृद्धिमान साहा झे. सिमथ गो. हॅझलवूड ३५, रविचंद्रन अश्विन झे. हॅडिन गो. स्टार्क ५०, भुवनेश्वर कुमार झे. वॉटसन गो. लिऑन ३०, मोहम्मद शमी नाबाद १६, उमेश यादव झे. हॅडिन गो. हॅरिस ४, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ७, वाइड १, नोबॉल ५) १७, एकूण १६२ षटकांत सर्व बाद ४७५.
बाद क्रम : १-०, २-९७, ३-२३८, ४-२९२, ५-२९२, ६-३५२, ७-३८३, ८-४४८, ९-४५६
गोलंदाजी : मिचेल स्टार्क ३२-७-१०६-३, रयान हॅरिस ३१-७-९६-२, जोश हेझलवूड २९-८-६४-१, नॅथन लिऑन ४६-११-१२३-२, शेन वॉटसन २०-४-५८-२, स्टिव्हन स्मिथ ४-०-१७-०.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ख्रिस रॉजर्स झे. रैना गो. कुमार ५६, डेव्हिड वॉर्नर झे. विजय गो. अश्विन ४, शेन वॉटसन त्रिफळा गो. अश्विन १६, स्टिव्हन स्मिथ पायचीत गो. शमी ७१, शॉन मार्श झे. विजय गो. अश्विन १, जो बर्न्‍स झे. यादव गो. अश्विन ६६, ब्रॅड हॅडिन खेळत आहे ३१, रयान हॅरिस खेळत आहे ०, अवांतर (बाइज २, लेगबाइज २, नोबॉल २) ६, एकूण ४० षटकांत ६ बाद २५१
बाद क्रम : १-६, २-४६, ३-१२६, ४-१३९, ५-१६५, ६-२५१
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ८-०-४६-१, आर. अश्विन १९-२-१०५-४, मोहम्मद शमी ६-०-३३-१, उमेश यादव ३-०-४५-०, सुरेश रैना ४-०-१८-०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 12:33 pm

Web Title: australia waltz to 348 run lead over india
Next Stories
1 सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश; अजिंक्य-भुवनेश्वरची झुंजार खेळी
2 फेडरर सुसाट
3 पेस अंतिम फेरीत
Just Now!
X