वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून
सातत्याने असातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचे आव्हान झटपट मोडून काढत दमदार मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणारी ‘बॉक्सिंग डे’ कसोटी ऑस्ट्रेलियासाठी नेहमीच फलदायी ठरली आहे. होबार्ट कसोटीत ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. कोणताही संघर्ष न करता सुमार प्रदर्शन करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळावर जोरदार टीका झाली होती.
होबार्ट येथे अ‍ॅडम व्होग्सने २६९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. या कसोटीतही धावांची टांकसाळ कायम राखण्याचा व्होग्सचा प्रयत्न आहे. व्होग्सला साथ देत शतकी खेळी करणाऱ्या शॉन मार्शला संघातून वगळण्यात आले आहे. जबरदस्त फॉर्मात असलेला उस्मान ख्वाजा दुखापतीतून सावरला असून, तो शॉनच्या जागी खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध उस्मानने १७४ आणि १२१ धावांची खेळी केली होती. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे उस्मान होबार्ट कसोटीत खेळू शकला नाही. मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर उस्मानने बिग बॅश ट्वेन्टी-२० स्पर्धेत ७० चेंडूंत १०९ तडाखेबंद खेळी केली. होबार्ट कसोटीत दोन्ही डावांमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या सलामीवीर जो बर्न्‍सला संघात कायम ठेवण्यात आले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ दोघेही मोठी खेळी करण्यासाठी आतुर आहेत.
जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल आणि जोश हेझलवूड या त्रिकुटावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. नॅथन लिऑन फिरकीचा भार सांभाळणार आहे. मिचेल मार्शला आपला अष्टपैलू खेळ सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे.
अनुनभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या वेस्ट इंडिज संघाला कामगिरीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. मार्लन सॅम्युअल्स आणि डॅरेन ब्राव्हो यांच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. कालरेस ब्रेथवेट या सामन्याद्वारे पदार्पण करण्याची शक्यता आहे. केमार रोच, जेरॉम टेलर धावा रोखण्यात आणि विकेट्स मिळवण्यात अपयशी ठरले होते. या दोघांसह जेसन होल्डर, जोमेल वॉरिकन यांच्यावर ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी आहे.
मेलबर्नची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मात्र सलामीच्या दिवशी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. चांगला खेळ करत कसोटी पाचव्या दिवसापर्यंत नेण्याचे आव्हान वेस्ट इंडिजसमोर आहे.

संघ
ऑस्ट्रेलिया- डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्‍स, स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, अ‍ॅडम व्होग्स, मिचेल मार्श, पीटर नेव्हिल, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल.
वेस्ट इंडिज – कालरेस ब्रेथवेट, क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, मार्लन सॅम्युअल्स, डॅरेन ब्राव्हो, जेरमाइन ब्लॅकवूड, दिनेश रामदीन, जेरोम टेलर, केमार रोच, जोमेल वारिकन, जेसन होल्डर

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,
वेळ : सकाळी ५.३० पासून