ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून रविवारी निवृत्ती जाहीर केल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली. ‘‘एकदिवसीय कारकीर्दीवर मी समाधानी आहे आणि तीन विश्वचषक स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळाली, हे मी भाग्य समजतो. निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.’’, अशी प्रतिक्रिया हॅडिनने दिली.  
ऑस्ट्रेलियाच्या आगामी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड कसोटी मालिकेच्या दौऱ्यापूर्वी हॅडिनने ही घोषणा केली. मार्च महिन्यात झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर विजय साजरा करून जेतेपद पटकावल्यानंतर हॅडिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले होते. जानेवारी २००१मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हॅडिनला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले, ‘‘हॅडिनला शुभेच्छा. त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी सर्वतोपरी योगदान दिले. त्याच्या योगदानाबद्दल आभार.’’