२०२० वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. लॉकडाउन पश्चात भारतीय संघाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन हे बीसीसीआयसमोरचं पहिलं प्राधान्य आहे. भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ तिकडूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होणार आहे. २०१८ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमित पराभवाचा धक्का दिला होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात कसोटी मालिकेत हरवणारा भारत पहिला आशियाई देश ठरला होता, असं असलं तरीही भारतीय संघाला हा मालिका विजय आता विसरण्याची गरज असल्याचं मत कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं आहे.

 

“स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन यांसारखे फलंदाज ऑस्ट्रेलियात परतले आहेत त्यामुळे यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा हा आमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. मागच्यावेळी आम्ही ऑस्ट्रेलियात मालिका जिंकलो होतो, आम्हा सर्वांसाठी तो अभिमानाचा क्षण होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणं खूप आव्हानात्मक असेल कारण गेल्या दौऱ्याच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ यंदा अधिक तयारीनिशी उतरेल. आम्ही प्रत्येक सामना एकजुटीने खेळणं गरजेचं आहे. एकावेळी एका सामन्याचाच विचार केला जायला हवा. २०१८ मध्ये काय घडलं हे आता विसरायला हवं. त्या मालिकेतील सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येक विजय हा भारतासाठी महत्वाचा आहे. मालिकेवर पकड बसवण्याच्या दृष्टीकोनातून पहिला कसोटी सामना हा नेहमी महत्वाचा असतो. यासाठी आम्ही चांगला खेळ करणं आवश्यक आहे.” अजिंक्य इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने खेळणार असून एक सामना हा गुलाबी चेंडूवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे गोलंदाज यंदा चांगल्या फॉर्मात असून ते ऑस्ट्रेलियाच्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांसारखाच मारा करत असल्याचं अजिंक्यने सांगितलं. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचं स्थान आणि प्रत्येक सामन्यात विजयातून मिळणारे गूण लक्षात घेत भारताला यंदा खेळावं लागणार असल्याचं अजिंक्यने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – मी वन-डे संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक – अजिंक्य रहाणे