भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. दोन्ही संघातील खेळाडू सज्ज असल्याचे संकेत देताना अनेक प्रकारची वक्तव्य करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने मैदानात खिलाडूवृत्तीने उतरणार असल्याचे सांगितले असले, तरी ऑस्ट्रेलियन संघाच्या शब्दांवर भारताचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला विश्वास नसल्याचे दिसते. यामुळेच त्याने ऑस्ट्रेलियाने मैदानात शाब्दिक वाद घातल्यास त्यांना ठोस प्रत्युत्तर देऊ, असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमीने ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंग परतवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी जर मैदानात स्लेजिंग केले तर त्यांना प्रत्युत्तर देण्यास आम्ही मागे पडणार नाही. ऑस्ट्रेलियन टीम स्लेजिंगसाठी चांगलीच लोकप्रिय आहे. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना स्लेजिंग करत त्यांचे लक्ष विचलित करण्यात ऑस्ट्रेलियन संघाचा हातखंडा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात उतरण्यापूर्वी स्लेजिंगविषयी शमी म्हणाला की, स्लेजिंग हा क्रिकेटच्या खेळातील एक भाग आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांमध्ये मोठी भागीदारी होत असेल तर त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बऱ्याचदा गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक स्लेजिंगचे अस्त्र वापतात. स्लेजिंग करत असताना मी अपशब्दाचा वापर कधीच करत नाही, हे देखील त्याने स्पष्ट केले.

यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. यात भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाचा हा भारत दौरा मैदानावरील वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. कसोटी मालिकेनंतर स्मिथने माफी देखील मागितली होती.