डॉमिनिका येथील विंडसॉर पार्क स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघाचा दुसरा डाव कोसळला आणि ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या दिवसअखेर नऊ विकेट्स राखून शानदार विजयाची नोंद केली.
शेन डॉवरिच आणि मार्लन सॅम्युअल्स (७४) यांनी चौथ्या विकेटसाठी १४४ धावांची भरभक्कम भागीदारी करून वेस्ट इंडिजचा डाव सावरला, परंतु चहापानापूर्वी डॉवरिच (७०) बाद झाला आणि विंडीजचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्याचे अखेरचे सात फलंदाज फक्त ३५ धावांत माघारी परतले. त्यामुळे ३ बाद १८१ अशा सुस्थितीनंतर विंडीजचा दुसरा डाव २१६ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार बळी घेतले.
त्यानंतर विजयासाठीचे ४७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरला (२८) गमावून आरामात पूर्ण केले. पदार्पणातच शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या अ‍ॅडम व्होग्सला सामनावीर किताबाने गौरवण्यात आले.